लाहोर: पाकिस्तान क्रिकेट संघ ( Pakistan Cricket Team ) श्रीलंकेविरुद्ध फक्त दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. याआधी दोन्ही संघांमध्ये तीन सामन्यांची एकदिवसीय आंतरराष्ट्रीय मालिकाही खेळवली जाणार होती, जी रद्द करण्यात आली आहे. पाकिस्तान क्रिकेट संघ या वर्षी जुलै-ऑगस्टमध्ये श्रीलंकेचा दौरा ( Pakistan tour of Sri Lanka ) करेल, ज्यामध्ये संघ 2021-23 आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा ( ICC World Test Championship ) भाग असेल. या दौऱ्याच्या तारखा अद्याप जाहीर झालेल्या नाहीत.
तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका आयसीसी विश्वचषक सुपर लीगचा भाग नव्हती. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने दिलेल्या वृत्तानुसार, श्रीलंका क्रिकेट बोर्डाने ( Sri Lanka Cricket Board ) पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला ( Pakistan Cricket Board ) एकदिवसीय सामने काढून टाकण्याची विनंती केली होती. कारण श्रीलंका क्रिकेट बोर्ड एक आठवड्यापूर्वी लंका प्रीमियर लीग ( Lanka Premier League ) आयोजित करण्याची योजना आखत होती.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे संचालक सामी-उल-हसन बर्नीच्या ( PCB Director Sami-ul-Hasan Bernie ) हवाल्याने एका अहवालात म्हटले आहे की, श्रीलंका बोर्ड आर्थिक नुकसान कमी करण्यासाठी एक आठवडा लवकर लीग सुरू करू इच्छित आहे. त्यामुळे त्यांनी आम्हाला एकदिवसीय मालिका रद्द करण्यास सांगितले, जी विनंती बोर्डाने मान्य केली आहे. एकदिवसीय मालिका विश्वचषक सुपर लीगचा भाग नसल्यामुळे आम्ही त्याला आक्षेप घेतला नाही. मालिकेच्या अंतिम वेळापत्रकावर अद्याप चर्चा सुरू असून लवकरच अहवाल जाहीर केला जाईल.