नवी दिल्ली : पाकिस्तान सुपर लीग 2023 मध्ये कर्णधार इमाद वसीमची टीम कराची किंग्सची कामगिरी आतापर्यंत खूपच खराब राहिली आहे. त्यामुळे कराची किंग्जचा मेंटर वसीम अक्रमचा राग उफाळून आला आहे. त्यामुळे वसीम अक्रमचा पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिकसोबत ड्रेसिंग रूममध्ये जोरदार वाद झाला, ज्याचा व्हिडिओ चर्चेचा विषय बनला आहे. शुक्रवार, 3 मार्च रोजी, पीएसएल लीगचा 19 वा सामना कराची किंग्ज आणि इस्लामाबाद युनायटेड यांच्यात खेळला गेला. या सामन्यात युनायटेडने कराची किंग्जवर 6 गडी राखून विजय मिळवला आहे. पीएसएल लीगच्या या मोसमात कराची किंग्जने आतापर्यंत 6 सामने गमावले आहेत. संघाचा मार्गदर्शक वसीम अक्रम याने किंग्जच्या सततच्या खराब कामगिरीवर नाराजी व्यक्त केली आहे.
ड्रेसिंग रूममधला व्हिडिओ व्हायरल :क्रिकेट पाकिस्तानने आपल्या ट्विटर हँडलवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. शुक्रवारच्या सामन्यात इस्लामाबाद युनायटेडविरुद्धच्या पराभवानंतर कराची किंग्जचे अध्यक्ष वसीम अक्रम व्हिडिओमध्ये अतिशय दुःखी दिसत आहेत. हा सामना संपल्यानंतर ड्रेसिंग रूममधला व्हिडिओ आहे. वसीम अक्रम पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिकसोबत ड्रेसिंग रूममध्ये बोलताना दिसत आहे. कराची किंग्जच्या पराभवावर अक्रम शोएब मलिकवर नाराजी व्यक्त करत आहे. पीएसएलच्या 19 व्या सामन्यात कराची किंग्जने मैदानात फलंदाजी करताना 20 षटकांत 5 गडी गमावून 201 धावा केल्या. त्याचवेळी इस्लामाबाद युनायटेडने 4 गडी गमावून 204 धावा केल्या आणि किंग्जचा 6 विकेट राखून पराभव केला.