नागपूर -पाकिस्तान सुपर लीगच्या टी-20 क्रिकेट मॅचवर सट्टेबाजी (खायवाडी) लावणाऱ्या एका आरोपीला नागपूर शहर पोलीस विभागाच्या झोन-२ च्या विशेष पथकाने रंगेहात अटक केली आहे. शुभम कुमार शंकरलाल राय असे आरोपीचे नाव असून तो मूळचा मध्य प्रदेश येथील शिवनीचा रहिवासी आहे. धक्कादायक म्हणजे आरोपी शुभम हा शिक्षणासाठी नागपुरला आला होता. मात्र लॉकडाऊनच्या काळात तो सट्टेबाजीच्या अवैध धंद्यात सक्रिय झाला होता, अशी माहिती डीसीपी विनिता साहू यांनी दिली आहे.
डीसीपी विनिता साहू यांना गोपनीय माहिती मिळाली की, सिताबर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खरे टाउन येथील सदाशिव अपार्टमेंटच्या दुसऱ्या माळ्यावरील फ्लॅटमध्ये शुभम कुमार राय ( वय २४) हा पाकिस्तान सुपर लीगच्या टी-20 क्रिकेट मॅचवर सट्टाबाजी करीत आहे. या माहितीच्या आधारे डीसीपी झोन-2 च्या विशेष पथकाला करवाई करण्याचे आदेश देण्यात आले. त्यानुसार पोलीस पथकाने संपूर्ण परिसराची रेकी केल्यानंतर शुभमच्या फ्लॅटवर धाड टाकण्यात आली. तेव्हा तो पाकिस्तान सुपर लीगच्या लाहोर विरुद्ध क्वेटा या सामन्यात ऑनलाइन खायवडी करताना आढळून आला. पोलिसांनी आरोपी शुभमला कलम 4, 5 महाराष्ट्र जुगार कायदा अन्वये अटक करण्यात आली आहे.
सट्टेबाजीसाठी उपयोगात येणारे साहित्य जप्त -
पोलिसांनी आरोपी शुभम कडून ०७ मोबाईल, ०३ टॅब, ०१ मॅक बुक, ०१ टीव्ही सेट ऑफ बॉक्ससह, १ हार्ड डिस्क, १ पोलो वोस्क वॅगन कार आणि 67 हजारांची रोख रक्कम असा एकूण 5 लाख 27 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.