सोलापूर -विजापूर नाका पोलिसांनी सट्टाबाजारातील एका बुकी चालकास अटक केली आहे. त्याकडून तीन मोबाईल, एक टीव्ही आणि साडेआठ हजार रुपये रोख रक्कम असा मुद्देमाल जप्त केला आहे. रफिक मोहम्मद सय्यद (वय 49 ,रा. ब्रम्हदेव नगर, होटगी रोड सोलापूर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. ही कारवाई विजापूर नाका पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाने केली आहे. एका खबऱ्याने माहिती दिल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. या आठवड्यात सोलापूर पोलिसांनी केलेली ही तिसरी कारवाई केली आहे. याअगोदर गुन्हे शाखेने आणि ग्रामीण पोलीस दलातील गुन्हे शाखेने केली आहे.
खबऱ्याने दिली माहिती -
सध्या आयपीएल क्रिकेटच्या मॅचेस असल्याने सट्टा बाजारावर पोलिसांनी नजर ठेवली आहे. पोलिसांनी सर्व खबऱ्यांना सतर्क केले आहे. विजापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत आयपीएल मॅचेसवर सट्टा बाजार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार डीबी पथकाने साफळा लावला. होटगी रोडवरील ब्रम्हदेव नगर येथे रफिक सय्यद यावर नजर ठेवण्यात आली होती. पंजाब इलेव्हन विरुद्ध मुंबई इंडियन्सची मॅच सुरू होती. त्यावेळी रफिक हा सट्टा घेत होता. खबऱ्याने इशारा करताच विजापूर नाका डीबी पथकाने बुकी चालकाच्या मुसक्या आवळल्या.
रफिक हा तर फक्त एजंट आणखीन मासे गळाला लागणार?
रफिक सय्यद हा 10 टक्केवर काम करणारा कमिशन एजंट आहे. इब्राहिम शेख याकडून त्याला कमिशन मिळत होती. पोलीस त्याचा कसून तपास करत आहेत. इब्राहिम शेख सोबत आयपीएल सट्टाबाजारातील आणखीन मोठे मासे पोलिसांच्या हाती लागण्याची शक्यता आहे. रफिक हा मोबाईलवरून ऑनलाइन पैसे गोळा करत होता आणि ऑनलाइन पैसेवर वर्ग करत होता. त्याच्या मोबाईलची तपासणी सुरू झाली आहे.