हैदराबाद :भारतीय क्रिकेट आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर ( Master Blaster Sachin Tendulkar ) यांच्यासाठी आजचा दिवस खुप मह्त्वाचा आहे. कारण आजच्या दिवशी दहा वर्षापूर्वी सचिन तेंडुलकरने जागतिक क्रिकेटमध्ये असामान्य विक्रमाची नोंद केली आहे. सचिन तेंडुलकरने 16 मार्च 2012 रोजी आपल्या शतकांचे महाशतक ( Sachin Tendulkar's 100th century ) लगावत भला मोठा इतिहास निर्माण केला. हा विक्रम त्याने आशियाई स्पर्धेत बांग्लादेश विरुद्ध खेळताना निर्माण केला आहे. त्यांनी 147 चेंडूचा सामना करताना 114 धावांची दमदार खेळी साकारली होती. हा कारनामा त्याने शेर-ए-बांग्ला स्टेडियम, मीरपुर येथे केला होता.
सचिन तेंडूलकारने त्याच्या क्रिकेट अनेक मोठे विक्रम निर्माण केले आहेत. त्यापैकी हा विक्रम सर्वात मोठा आहे. कारण जगातील कोणत्याच क्रिकेटपटूंनी ही कामगिरी केलेली नाही. तसेच पुढेही कोणी करु शकेल, याची शक्यता खुपच कमी आहे. कारण वास्तविक, सचिनचे हे शतक त्याच्या बॅटमधून आलेले 100 वे आंतरराष्ट्रीय शतक ( 100th International Century ) होते. सचिनचा हा विक्रम आजही कायम आहे. सचिन तेंडुलकर हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके करणारा पहिला आणि एकमेव खेळाडू आहे.
सचिनने जेव्हा आपले शतकांचे महाशतक पूर्ण केले, तेव्हा तो 38 वर्षांचा होता. तसेच त्याला 99व्या शतकानंतर 100व्या शतकासाठी जवळपास एक वर्ष वाट पाहावी लागली होती. सचिनने 2011 च्या विश्वचषकात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 99 वे शतक ( 99th century against South Africa ) झळकावले होते. तसेच 2012 च्या सामन्याबद्दल बोलायचे झाले तर सचिन तेंडुलकर त्याच्या कारकिर्दीतील 462 वा एकदिवसीय सामना खेळण्यासाठी आला होता. या सामन्यात बांगलादेशने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. तेंडुलकर आणि गौतम गंभीर क्रीझवर होते. मात्र, तेव्हा भारताची सुरुवात खराब झाली होती आणि भारताने पहिली विकेट 25 धावांवर गमावलेली.
गंभीर बाद झाल्यानंतर सचिन तेंडुलकरने विराट कोहली आणि सुरेश रैना यांच्यासोबत भारताची धावसंख्या 250 च्या पुढे नेली. यासोबतच सचिन तेंडुलकरनेही आपले 100 वे शतक पूर्ण केले. या सामन्यात सचिनने 147 चेंडूत 114 धावा ( Tendulkar's 114 off 147 balls ) केल्या. सचिनचे शानदार शतक आणि कोहली, रैनाच्या अर्धशतकांच्या जोरावर भारताने बांगलादेशला 290 धावांचे लक्ष्य दिले. परंतु भारताला हा सामना जिंकता आला नाही.