नवी दिल्ली : भारत या वर्षाच्या अखेरीस एकदिवसीय विश्वचषक 2023 चे यजमान पद भूषवणार आहे. त्यामुळे सर्व क्रिकेट चाहते या मेगा इव्हेंटच्या वेळापत्रकाची आतुरतेने वाट पाहत आहेत. क्रिकेटप्रेमींनो आता तुम्हाला जास्त दिवस वाट पाहण्याची गरज नाही. कारण मिळालेल्या माहितीनुसार बीसीसीआय आणि आयसीसी या महिन्याच्या पुढील आठवड्यात मुंबईत एका कार्यक्रम आयोजित करणार आहे. या कार्यक्रमात विश्वकप 2023चे वेळापत्रक जाहीर केले जाण्याची शक्यता आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या ट्विटमुळे याबाबतची चर्चा रंगू लागली आहे.
पाकिस्तानमुळे वेळापत्रकाला उशीर : एकदिवसीय विश्वचषक 2023 च्या वेळापत्रकाचा मसुदा बीसीसीआयने आयसीसीकडे खूप पूर्वी पाठवला होता. मात्र पीसीबीकडून सातत्याने वर्ल्डकपबाबत आक्षेप घेतला जात होता. यामुळे मंडळाकडून अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, पुढील आठवड्यापर्यंत अंतिम वेळापत्रक जाहीर केले जाऊ शकते. तर पकिस्तान क्रिकेट बोर्डाने अद्याप आयसीसीकडे वेळापत्रकाबाबत मान्यता पाठवलेली नाही. यापूर्वी पीसीबीचे चेअरमन नजम सेठी यांनी 2023 च्या विश्वचषकात पाकिस्तान संघाच्या सहभागाबाबत विधान केले होते. नजम सेठी म्हणाले होते की, त्यांनी आयसीसीला आधीच कळवले होते की आम्ही वेळापत्रकाबाबत कोणतेही प्रतिक्रिया देऊ शकत नाही. आमचा संघ पाकिस्तान सरकारवर अवलंबून आहे, जसे भारत सरकारच्या परवानगीने भारतीय संघ करतो.