वेलिंग्टन - भारत आणि न्यूझीलंड यांच्यात १८ जूनपासून जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना होणार आहे. या सामन्यानंतर न्यूझीलंडचा दिग्गज कसोटी यष्टीरक्षक फलंदाज बी. जे. वॉटलिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेणार आहे. न्यूझीलंडसाठी वॉटलिंगचा हा शेवटचा सामना असणार आहे.
वॉटलिंग म्हणाला, निवृत्ती घेण्याची ही योग्य वेळ आहे. न्यूझीलंडचे प्रतिनिधीत्व करणे ही सन्मानाची आणि खास बाब आहे. कसोटी हेच क्रिकेटचे मुख्य स्वरुप आहे. मी कसोटी खेळताना संघाकडून प्रत्येक मिनिटाचा आनंद घेतला. त्या पाच दिवसानंतर मी संघातील खेळाडूसोबत बिअर घेऊन बसणे, मला लक्षात राहील. मी काही महान खेळाडूंबरोबर खेळलो आहे आणि बरेच चांगले मित्र केले आहेत. या प्रवासात मला खूप मदत मिळाली आहे आणि मी सर्वांचा आभारी राहीन.'