नवी दिल्ली : न्यूझीलंडमधील अनिश्चित हवामान श्रीलंकेसाठी पुन्हा एकदा महागात पडले आहे. ख्राईस्टचर्च येथे दोन संघांमधील दुसरा एकदिवसीय क्रिकेट सामना एकही चेंडू टाकल्याशिवाय रद्द करण्यात आला. सामना रद्द झाल्यानंतर श्रीलंकेला सुपर लीगचे पाच महत्त्वाचे गुण मिळाले आहेत, परंतु 2023 च्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेसाठी थेट पात्रतेच्या त्यांच्या आशा धुळीस मिळाल्या आहेत. दुसरा सामना रद्द झाल्यामुळे श्रीलंकेच्या यंदाच्या आयसीसी पुरुष क्रिकेट विश्वचषक स्पर्धेसाठी थेट पात्रतेच्या आशा आता पूर्णपणे तिसऱ्या एकदिवसीय सामन्यावर अवलंबून आहेत.
थेट पात्र होण्यासाठी शेवटची संधी : श्रीलंकेला आता जून आणि जुलैमध्ये झिम्बाब्वेमध्ये खेळल्या जाणार्या स्पर्धेतून पात्रता मिळवण्याची संधी आहे. सुपर लीगमध्ये श्रीलंकेचा आता फक्त एक सामना शिल्लक आहे. शुक्रवारी हॅमिल्टनमध्ये न्युझीलंविरुद्धच्या मालिकेतील तिसरा आणि शेवटच्या वनडे सामना आहे. विश्वचषकाला पात्र होण्याच्या रेस मध्ये वेस्ट इंडिजला पछाडण्यासाठी आणि स्पर्धेला आपोआप पात्र ठरण्यासाठी ही त्यांची शेवटची संधी आहे. पण जरी श्रीलंकेने न्यूझीलंडविरुद्धचा अंतिम एकदिवसीय सामना जिंकला, तरी सुपर लीगमध्ये अतिरिक्त १० गुण मिळविण्यासाठी आणि क्रमवारीत आठव्या स्थानावर पोहोचण्यासाठी त्यांना झिम्बाब्वेमधील पात्रता फेरी खेळावी लागू शकते. कारण १० व्या स्थानावर असलेल्या दक्षिण आफ्रिकेकडे श्रीलंकेला मागे टाकण्यासाठी पुरेसे सामने आहेत.