साउथम्पटन - भारताविरुद्ध जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना खेळण्यासाठी न्यूझीलंडचा संघ साउथम्पटनमध्ये दाखल झाला आहे. न्यूझीलंडने त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरुन एक व्हिडिओ पोस्ट करत याची माहिती दिली. व्हिडिओत न्यूझीलंडचे खेळाडू हॉटेलमध्ये जाताना पाहायला मिळत आहेत.
न्यूझीलंडचा आत्मविश्वास दुणावला -
न्यूझीलंडच्या संघाने अंतिम सामन्याआधी इंग्लंडविरोधात दोन सामन्याची कसोटी मालिका खेळली. यात त्यांनी १-० असा विजय मिळवला. या विजयासह ते जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेत अव्वलस्थानी पोहोचले आणि भारतीय संघ दुसऱ्या स्थानी घसरला. विशेष म्हणजे, तब्बल २२ वर्षानंतर न्यूझीलंडच्या संघाने इंग्लंडमध्ये मालिका जिंकली आहे. यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढला आहे.
भारतीय संघाचे टेन्शन वाढलं -
न्यूझीलंड संघाने इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत तुफान फलंदाजी केलेल्या डेव्हॉन कॉनवे याला अंतिम सामन्यासाठी निवडण्यात आलेल्या संघात स्थान दिलं आहे. डेव्हॉन कॉनवे याने इंग्लंडविरुद्ध द्विशतकासह सर्वाधिक ३०६ धावा झोडपल्या. तसेच न्यूझीलंडने फक्त एकाच फिरकीपटूला स्थान दिले आहे. अजाझ पटेल हा एकमेव फिरकीपटू न्यूझीलंडच्या संघात दिसणार आहे. तर अष्टपैलू कॉलीन डी ग्रँडहोम आणि फलंदाज विल यंग यांच्यासह टॉम ब्लंडल याला राखीव यष्टिरक्षक म्हणून संघात निवडण्यात आले आहे.
केन विल्यमसनची दुखापत -
अंतिम सामन्याआधी कर्णधार केन विल्यमसन दुखापतीतून सावरला पाहिजे, अशी प्रार्थना न्यूझीलंडचे चाहते करत आहेत. विल्यमसनला इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात दुखापत झाली होती. त्यामुळे तो दुसरा सामना खेळला नव्हता.
जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी न्यूझीलंडने निवडलेला संघ
केन विल्यमसन (कर्णधार), टॉम ब्लंडल, ट्रेंट बोल्ट, डेव्हॉन कॉनवे, कॉलीन डी ग्रँडहोम, मॅट हेन्री, कायले जेमिन्सन, टॉम लॅथम, हेन्री निकोल्स, अजाझ पटेल, टीम साऊदी, रॉस टेलर, नेल वॅगनर, बीजे वॉटलिंग आणि विल यंग.