मुंबई -आयसीसी वर्ल्ड कप लीग 2 ची सुरूवात झाली आहे. ही मालिका ओमान, नेपाळ आणि अमेरिका यांच्यात खेळवण्यात येत आहे. लीगमधील दुसऱ्या सामन्यात ओमानने नेपाळचा पाच गडी राखून पराभव झाला. पण या सामन्यात नेपाळच्या एका खेळाडूने अप्रतिम झेल घेत वाहवा मिळवली. खुद्द आयसीसीने देखील त्या खेळाडूचे कौतुक केले आहे.
नेपाळ आणि ओमान यांच्यात पार पडलेल्या सामन्यात नेपाळ रोहित पौडेल याने सीमारेषेजवळ हवेत झेप घेत अप्रतिम झेल टिपला. ओमानच्या फलंदाजीदरम्यान, 26व्या षटकात कुशल मल्ला याचा तिसरा चेंडू जतिंदर सिंह याने लॉग ऑनच्या दिशेने जोरात टोलावला. जतिंदरने मारलेला फटका पाहता, चेंडू सहजपणे सीमारेषेबाहेर जाणार असे सर्वांना वाटत होते. पण रोहित हवेत झेप घेत तो चेंडू पकडून सर्वांना आश्चर्यचकित केले.
रोहित धावत जाऊन सीमारेषेजवळ पोहचला आणि त्याने हवेत सूर मारत एका हाताने चेंडू झेलला, अशात त्याचा तोल सीमारेषेबाहेर जात होता. तेव्हा त्याने चेंडू सीमारेषेच्या आत हवेत फेकला. नंतर सीमारेषेबाहेर जाऊन परत सीमारेषेच्या आत येत तो चेंडू पकडला. यासह जतिंदर सिंगची 107 धावांची खेळी संपुष्टात आली.