मुंबई - सचिन तेंडुलकरला गोलंदाजी करताना भीती वाटत नव्हती, असा खुलासा श्रीलंकेचा दिग्गज फिरकीपटू मुथय्या मुरलीधरन याने केला. पण विरेंद्र सेहवाग आणि ब्रायन लारा यांना गोलंदाजी करताना भीती वाटायची, अशी कबुली देखील मुरलीधरन याने दिली.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक गडी बाद करणारा मुरलीधरन म्हणाला, सद्यघडीला भारतीय कर्णधार विराट कोहली आणि पाकिस्तानचा बाबर आझम हे माझ्या गोलंदाजीचा सामना चांगला सामना करू शकतील.
मुरलीधरन एका मुलाखतीमध्ये म्हणाला की, सचिनला गोलंदाजी करताना मला भीती वाटत नव्हती. कारण तो खूप आक्रमक फटके मारत नव्हता. याविरुद्ध विरेंद्र सेहवाग होता. तो मोठे फटके खेळण्यात पटाईत होता. पण सचिन आपली विकेट राखून ठेवण्यात माहिर होता. तो चेंडूचा योग्य टेकनिकने सामना करत होता.
कसोटीत 800 हून अधिक विकेट घेणारा मुरलीधरन म्हणाला, माझ्या करियरमध्ये मला वाटलं की, ऑफ स्पिन गोलंदाजी, सचिनची दुबळी बाजू आहे. तो लेग स्पिनवर जोरदार प्रहार करत असे. पण ऑफ स्पिन खेळताना त्याला थोडीशी अडचण येत होती. कारण मी त्याला अनेकदा बाद केलं आहे. याशिवाय अनेक ऑफ स्पिनरचा तो बळी ठरला आहे. हे मी खूप वेळा पाहिलं आहे.