मुंबई - भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि सध्या चेन्नई सुपर किंग्जचे नेतृत्व करणाऱ्या महेंद्रसिंह धोनी याच्या आई आणि वडिलांना कोरोनाची लागण झाली आहे. धोनीचे वडील पान सिंग आणि आई देविका देवी यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. दोघांनाही रांची येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
धोनीचे आई-वडील यांना रांची येथील पल्स सुपर स्पेशॅलिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने या संदर्भातील वृत्त दिलं आहे. एएनआयच्या वृत्तानुसार, धोनीचे वडील पान सिंह आणि आई देविका देवी यांच्या कोरोना चाचणीचा निकाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.
धोनीच्या आई-वडिलांना दाखल करण्यात आलेल्या पल्स सुपर स्पेशॅलिटी हॉस्पीटलच्या डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, धोनीच्या आई-वडीलांची प्रकृती स्थिर आहे. दोघांच्या शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण सामान्य असून त्यांच्या फुफ्फुसांना कोरोनाचा संसर्ग झालेला नाही. उपचारांनंतर पुढील काही दिवसांमध्ये धोनीचे आई-वडील बरे होतील, अशा विश्वासही डॉक्टरांनी व्यक्त केला आहे.