मुंबई - टी-20 विश्वकरंडक स्पर्धेसाठी महेंद्रसिंग धोनीची निवड भारतीय संघाचा मार्गदर्शक म्हणून करण्यात आली आहे. बीसीसीआयच्या या निर्णयावर भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीर याने आनंद व्यक्त केला. त्याने धोनीचा अनुभव युवा खेळाडूंसाठी उपयोगी ठरेल, असे म्हटलं आहे.
बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी बुधवारी रात्री, धोनीला टी-20 विश्वकरंडक स्पर्धेसाठी भारतीय संघाचा मार्गदर्शक म्हणून नेमण्यात आल्याचे जाहीर केले आहे. याविषयी गौतम गंभीर म्हणाला, धोनीचा अनुभव आणि दबाव पेलण्याची मानसिकता यामुळे त्याची टी-20 विश्वकरंडक स्पर्धेत मार्गदर्शक म्हणून नियुक्ती झाली आहे. धोनीच्या अनुभवाचा फायदा संघातील युवा खेळाडूंना होईल. तो दबावाची परिस्थिती हाताळू शकतो.
अश्विनच्या निवडीमुळे भारतीय संघाला बळकटी
टी-20 विश्वकरंडकात आर. अश्विनची निवड भारतीय संघाला बळकटी देईल. अश्विन गुणवत्तेने भरलेला क्रिकेटपटू आहे. त्याने पांढऱ्या चेंडूवर अधिक क्रिकेट खेळले पाहिजे होते. अश्विनसाठी मी खूप खूश आहे. तो संघात परतला आहे. याचे श्रेय आपल्याला निवडकर्त्यांना दिलं पाहिजे. त्याच्या येण्याने संघाला आणखी बळकटी मिळेल. अश्विन नव्या चेंडूसोबत तसेच मधल्या षटकात गोलंदाजी करू शकतो. त्याचा वापर डेथ ओव्हरमध्ये देखील करता येऊ शकते, असे देखील गंभीर म्हणाला.