नवी दिल्ली :भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने कसोटी क्रिकेटमध्ये आपल्या फलंदाजीची जबरदस्त कामगिरी केली आहे. बॉर्डर गावस्कर मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी शमीने फलंदाजी करताना कांगारू गोलंदाजांचे षटकार खेचले. शमीने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांची धुलाई करताना 47 चेंडूत 37 धावा केल्या. शमीने या खेळीत 2 चौकार आणि 3 षटकार मारले आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याच्या बाबतीत मोहम्मद शमीने विराट कोहली, युवराज सिंग आणि केए राहुलसह अनेक भारतीय दिग्गजांना मागे टाकले आहे. नागपुरात खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यात शमीने 25 षटकार पूर्ण केले आहेत.
कसोटी क्रिकेटमध्ये 722 धावा :टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने कसोटी क्रिकेटमध्ये 722 धावा केल्या आहेत. शमीने 61 कसोटी सामन्यांच्या डावात 25 षटकार पूर्ण केले आहेत. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात नागपुरात पहिला कसोटी सामना खेळला जात आहे. या सामन्यात मोहम्मद शमीने अपेक्षित नसलेला पराक्रम करून आपली बॅट दाखवली. पहिल्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी शमीने झंझावाती खेळी खेळताना 40 चेंडूत 37 धावा केल्या. शमीची ही धावसंख्या ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावातील 9 खेळाडूंपेक्षा जास्त आहे. या खेळीनंतर शमी कसोटीत सर्वाधिक षटकार मारणारा 16 वा भारतीय खेळाडू ठरला आहे. विराट कोहलीने 178 कसोटी डावांमध्ये 24 षटकार मारले आहेत. त्याचवेळी शमीने 61 सामन्यांच्या 85 व्या डावात 25 षटकार ठोकले आहेत. कोहलीशिवाय शमीने माजी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड, युवराज सिंग यांच्यासह अनेक दिग्गजांना पराभूत केले आहे.