हैदराबाद - भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार मोहम्मद अझहरुद्दीनला हैदराबाद क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदावरुन निलंबित करण्यात आले आहे. अझहरुद्दीनवर मनमानी निर्णय घेणे, हितसंबंधांची माहिती न देणे आणि भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले असून या प्रकरणी असोसिएशनने अझहरुद्दीनला कारणे दाखवा नोटीस देखील बजावली आहे. या प्रकरणाच्या आरोपाची चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत तो अध्यक्षपदावरुन निलंबित असेल. त्याचबरोबर त्याचे सदस्यत्वही रद्द करण्यात आले आहे.
मोहम्मद अझहरुद्दीन विरुद्ध सदस्यांनी केलेल्या तक्रारीनंतर त्याला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. अझरवर नियमभंग करण्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. याशिवाय अझहरुद्दीन दुबईतील एका क्रिकेट क्लबचा सदस्य देखील आहे. हा क्लब बीसीसीआयने मान्यता न दिलेल्या स्पर्धेत खेळतो. याबाबतची माहिती अझहरुद्दीनने असोसिएशनपासून लपवून ठेवल्याचाही त्याच्यावर आरोप आहे.