अहमदाबाद : भारताची माजी कर्णधार मिताली राजची महिला प्रीमियर लीग (WPL) टीम गुजरात जायंट्सने मार्गदर्शक आणि सल्लागार म्हणून नियुक्ती केली आहे. महिला प्रीमियर लीगचा प्रारंभिक टप्पा यावर्षी मार्च-एप्रिलमध्ये होणार आहे.
अहमदाबाद फ्रँचायझी सर्वात महाग : महिला प्रीमियर लीग साठी नुकत्याच झालेल्या लिलावात अहमदाबाद फ्रँचायझी पाच संघांमध्ये सर्वात महाग होती. या फ्रँचायझी साठी अदानी स्पोर्टलाइनने 1,289 कोटी रुपयांची बोली लावली होती. मितालीने शनिवारी सांगितले की, महिला प्रीमियर लीगचा उद्घाटन हंगाम महिला क्रिकेटसाठी एक उत्तम पाऊल आहे. तसेच अदानी समूहाचा सहभाग या खेळाला मोठी चालना देणारा आहे. बीसीसीआयच्या या उपक्रमामुळे देशात महिला क्रिकेटच्या विकासाला मदत होईल आणि युवा खेळाडूंनाही व्यावसायिकपणे क्रिकेट खेळण्यासाठी प्रोत्साहन मिळेल, असे ती म्हणाली.
गेल्या वर्षी निवृत्ती घेतली : महिला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या मितालीने गतवर्षी सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर केली होती. तिने तब्बल 23 वर्षे भारतीय संघाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले आहे. 40 वर्षीय मिताली गुजरातमध्ये महिला क्रिकेटला प्रोत्साहन देण्यासाठी आणि संघाची मार्गदर्शक म्हणून तळागाळातून खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी देखील मदत करेल. मितालीने भारतासाठी 89 टी-20 सामने खेळले असून तिने 37.52 च्या सरासरीने 2,364 धावा केल्या आहेत. यामध्ये 17 अर्धशतकांचा समावेश आहे. टी ट्वेंटी फॉर्मेटमधून निवृत्तीची घोषणा करण्यापूर्वी तिने घरच्या मैदानावर 2019 मध्ये इंग्लंडविरुद्ध भारतासाठी शेवटचा टी-20 सामना खेळला होता. अदानी एंटरप्रायझेसचे संचालक प्रणव अदानी म्हणाले, आम्हाला विश्वास आहे की मितालीसारख्या आंतरराष्ट्रीय खेळाडूची उपस्थिती केवळ क्रिकेटमध्येच नव्हे तर इतर प्रत्येक खेळातही नवीन प्रतिभा आकर्षित करेल.