मुंबई - भारतात कोरोनाने हाहाकार माजवला आहे. दररोज तीन लाखाहून अधिक नवे कोरोना रुग्ण देशात आढळून येत आहे. या पार्श्वभूमीवर आयपीएलमध्ये सहभागी खेळाडूंमध्ये भीतीचे वातावरण आहे. अशात ऑस्ट्रेलिया सरकारने भारतातील परिस्थिती पाहून प्रवाशी विमान सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. ऑस्ट्रेलियन सरकारच्या या कठोर निर्णयामुळे भारतात अडकलेले खेळाडू मायदेशी परतू शकत नाहीत. या विषयावरून आयपीएलमधील एका ऑस्ट्रेलियन समालोचकाने थेट त्यांच्या पंतप्रधानांनाच प्रश्न विचारला आहे.
ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू आणि समालोचक मायकेल स्लेटर यांनी ट्विटद्वारे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांना खडे बोल सुनावले आहे. स्लेटर यांनी म्हटलं आहे की, 'जर आमचे सरकार ऑस्ट्रेलिया नागरिकांच्या सुरक्षेची चिंता करत असेल, तर त्यांनी आम्हाला आमच्या घरी पोहोचवायला हवे. पण ही लाजिरवाणी बाब आहे. पंतप्रधान तुमचे हात खुनाने माखलेले आहेत. आमच्याशी असे वागण्याची तुमची हिंमत कशी झाली? तुमच्या क्वारंटाइन सिस्टिमचे काय झालं. मी सरकारकडून आयपीएलमध्ये काम करण्याची परवानगी घेतली होती, पण आता सरकार आमच्याकडे दुर्लक्ष करीत आहे.'