नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य निवडकर्ता चेतन शर्मा यांनी भारतीय क्रिकेट संघातील खेळाडूंबाबत मोठा खुलासा केला आहे. त्यांनी बनावट इंजेक्शनपासून विराट कोहली, रोहित शर्मा, हार्दिक पांड्या, सौरव गांगुली इत्यादी खेळाडूंच्या प्रत्येक गोष्टीवर मोठे वक्तव्य केले आहे. हा सर्व खुलासा त्यांनी एका स्टिंग ऑपरेशन मध्ये केला आहे.
खेळाडू फिट राहण्यासाठी इंजेक्शन घेतात : स्टिंग ऑपरेशन मध्ये चेतन शर्मा यांनी टीम इंडियाच्या अनेक गोपनीय गोष्टींबद्दल सांगितले. ते म्हणाले की, भारतीय क्रिकेटपटू फिट राहण्यासाठी इंजेक्शन घेतात. तसेच त्यांना कोणते इंजेक्शन डोपिंग अंतर्गत येत नाही हे देखील माहीत आहे. विराट कोहली आणि रोहित शर्माला संघातून बाहेर काढण्यासाठी विश्रांतीचे कारण पुढे केले जात असल्याचेही ते म्हणाले. टीम इंडियाचे खेळाडू पेन किलर घेत आहेत, असे स्टिंगमध्ये विचारण्यात आले होते. यावर चेतन शर्मा म्हणतात की नाही. खेळाडूंनी पेनकिलर घेतल्यास ते डोपिंगच्या कक्षेत येईल. टीम इंडियाच्या खेळाडूंना अँटी-डोपिंगमध्ये कोणते इंजेक्शन येतात हे माहीत आहे.
एक-दोन खेळाडू खाजगीत इंजेक्शन घेतात : त्यानंतर त्यांना जसप्रीत बुमराहच्या फिटनेसबद्दल विचारण्यात आले. यावर ते म्हणाले की, गंभीर दुखापत झाल्यामुळे बुमराहला खाली झुकणे देखील शक्य नव्हते. याशिवाय एक-दोन खेळाडू खाजगीत इंजेक्शन घेतात, असेही ते म्हणाले. त्याचवेळी बनावट फिटनेसच्या वापरावर ते म्हणाले की, खेळाडू तंदुरुस्त नसतात, पण खेळण्यासाठी ते इंजेक्शन घेतात. 80 टक्के फिटनेस असतानाही ते खेळण्यास तयार होतात. ते इंजेक्शन घेतात आणि खेळायला लागतात.