मुंबई - विश्वविजेता इंग्लंड संघाचा यष्टीरक्षक फलंदाज जोस बटलर भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीचा फॅन बनला आहे. इंग्लंडच्या या क्रिकेटपटूने धोनीवर स्तुतीसुमने उधळली आहेत. विश्वकरंडक २०११च्या अंतिम सामन्यात धोनीने मारलेला विजयी षटकार आपला फेवरेट असल्याचे बटलरने म्हटलं आहे.
बटलर म्हणाला की, '२०११ च्या विश्व करडंक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात धोनीने मारलेला षटकार मला खूप आवडतो. धोनीचे ज्या पद्धतीने बॅट फिरवली होती, ते पाहणे शानदार होते. तो क्षण भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात मोठा क्षण होता. मी त्याला खेळताना पाहू इच्छितो.'
यष्टीरक्षकाच्या भूमिकेत असताना धोनी विजेच्या वेगाने हालचाल करतो, असे देखील बटलर म्हणाला. धोनीचा शांत स्वभाव आणि त्याची प्रतिभा याचा मी चाहता आहे, असेही बटलर म्हणाला. दरम्यान, धोनीने २०११च्या विश्वकरंडक स्पर्धेत धोनीने षटकार खेचत भारताला विश्वविजेता केलं होतं.