मुंबई - देशातील वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव आणि खेळाडूंना झालेली लागण, यामुळे बीसीसीआयने आयपीएल स्पर्धा स्थगित करण्याचा निर्णय घेतला. या स्पर्धेचा दुसरा टप्पा सप्टेंबर महिन्यात खेळवण्याचा विचार बीसीसीआय करत आहे. परंतु आंतरराष्ट्रीय वेळापत्रक पाहता हे थोडेसे कठीण वाटत आहे. पण ही स्पर्धा न झाल्यास बीसीसीआयला किती कोटींचे नुकसान होईल, याची माहिती बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी दिली आहे.
आयपीएलचा चौदावा हंगाम पूर्ण न झाल्यास २५०० कोटींचे नुकसान होईल, अशी माहिती बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी दिली आहे. गांगुली यांनी सांगितलं की, 'अनेक फेरबदल करावे लागणार आहेत. अन्य बोर्डांशी देखील चर्चा सुरू आहे आणि टी-२० विश्व करंडकाआधी उर्वरित आयपीएल खेळवण्याचा प्रयत्न सुरू आहे. पण, जर आम्ही आयपीएलचा दुसरा टप्पा घेण्यास अपयशी ठरतो, तर जवळपास २५०० कोटींचे नुकसान होईल.'
दरम्यान, बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने याआधी सांगितलं आहे की, 'हा हंगाम मध्येच स्थगित केल्यामुळे आम्हाला २००० ते २५००० कोटींचे नुकसान होऊ शकतो. माझ्या माहितीनुसार २२०० कोटींचं नुकसान निश्चित आहे.'