महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

IND Vs NZ, 3rd T20: टीम इंडियाकडून न्यूझीलंडला 'व्हाईट वॉश'.. तिसऱ्या सामन्यात किवींचा 73 धावांनी पराभव

Cricket T20
Cricket T20

By

Published : Nov 21, 2021, 6:49 PM IST

Updated : Nov 21, 2021, 10:45 PM IST

22:44 November 21

न्यूझीलंडचा 111 धावांत खुर्दा.. भारताचा 73 धावांनी दणदणीत विजय

कोलकाता -  भारत-न्यूझीलंडमधील तीन सामन्यांच्या मालिकेतील कोलकात्यातील ईडन गार्डन मैदानावर खेळविण्यात आलेल्या तिसऱ्या सामन्यात रोहित शर्माच्या नेतृत्वातील भारतीय संघाने न्यूझीलंडचा 73 धावांनी पराभव केला.  पहिले दोन सामनेही भारताने या मालिकेत विजयी आघाडी घेतली होती. आज खेळल्या गेलेल्या तिसऱ्या सामन्यातही न्यूझीलंडला चारीमुंड्या चीत करत भारताने मालिकेवर निर्विवाद वर्चस्व राखले आहे.  

आजच्या टी-20 सामन्यात टीम इंडियाने न्यूझीलंडविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना भारताने 20 षटकात सात बाद  184 धावा केल्या. कर्णधार रोहित शर्माने ( सर्वाधिक 56 धावा केल्या. दीपक चहरने 8 चेंडूत झटपट 21 धावा काढून भारताची धावसंख्या 184 वर पोहोचवली. 185 धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडची खराब सुरुवात झाली. मार्टिन गुप्टिल आणि डॅरिल मिशेल यांनी पहिल्या विकेटसाठी 13 चेंडूत 21 धावांची भागीदारी केली. ही भागीदारी अक्षर पटेलने मिशेलला (5) बाद करून तोडली. त्याच षटकातील शेवटच्या चेंडूवर अक्षरने मार्क चॅपमनला (0) ऋषभ पंतला यष्टीमागे त्रिफळाचीत केले. अक्षरने आपली घातक गोलंदाजी सुरू ठेवली आणि पुढच्याच षटकात ग्लेन फिलिप्सचा (0) बळी घेतला.  30 धावांतच न्यूझीलंडचे 3 आघाडीचे फलंदाज तंबूत परतले होते.  10 षटकात न्यूझीलंडने  3 गडी गमावून 68 धावा केल्या. त्यानंतर लोकी फर्गुसन 14 व सिफर्ट 17 या दोघांनाच दोन अंकी धावसंख्या गाठता आली. न्यूझीलंडचा डाव 17.2 षटकात 111 धावांत आटोपला व भारताने हा सामना 73 धावांनी जिंकला. भारताकडून अक्षर पटेलने तीन तर हर्षल पटेलने 2 बळी घेतले. दीपक चहर, युझवेंद्र चहल व व्यंकटेश अय्यर यांना प्रत्येकी 1-1 बळी घेतला.  

20:55 November 21

भारताचा डाव, रोहितचे सलग दुसरे अर्धशतक

कोलकाता -भारत-न्यूझीलंड संघांदरम्यान खेळल्या जात असलेल्या तीन टी-20 सामन्याच्या मालिकेतील तिसरा व अंतिम टी-20 सामना कोलकाता येथील ईडन गार्डन मैदानावर खेळला जात आहे. भारतीय कर्णधार रोहित शर्माने सलग तिसऱ्यांदा नाणेफेक जिंकली. रोहितने या सामन्यात प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. केएल राहुलच्या जागी संघात स्थान मिळालेल्या इशान किशनसोबत रोहित शर्माने भारतीय डावाची सुरुवात केली. या दोघांनी पहिल्या गड्यासाठी ६९ धावांची भागीदारी करत संघासाठी मोठ्या धावसंख्येचा पाया रचला. दोघांच्या आक्रमक फटकेबाजीमुळे भारत मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करू लागला. पण किवी कर्णधार मिचेल सँटनरने टाकलेल्या सातव्या षटकात किशन (२९) आणि सूर्यकुमार यादव (०) यांना एकापाठोपाठ तंबूत धाडले. त्यानंतर आलेल्या ऋषभ पंतलाही काही खास करता आले नाही. चार धावा काढून पंतही माघारी परतला. दुसऱ्या बाजूला स्थिरावलेल्या रोहितने या मालिकेत सलग दुसरे अर्धशतक झळकावून तोही माघारी परतला व भारताची मोठी धावसंख्या उभारण्याच्या मनसुब्याला धक्का बसला. फिरकीपटू ईश सोधीने त्याचा आपल्याच गोलंदाजीवर अप्रतिम झेल टिपला. रोहितने ३ चौकार आणि ६ षटकारांसह ५६ धावा केल्या. त्यानंतर श्रेयस अय्यर आणि व्ंयकटेश अय्यर यांनी छोटी भागीदारी रचली. व्यंकटेशने २० तर अय्यरने २५ धावा केल्या. त्यानंतर आलेल्या हर्षल पटेलने १८ धावांचे योगदान दिले.तो हीट विकेट बाद झाला.  तर शेवटच्या षटकात दीपक चहरने १९ धावांची फटकेबाजी केली. दीपकने २१ धावांची खेळी केली. २० षटकात भारताने ७ बाद १८४ धावा केल्या. न्यूझीलंडकडून सँटनरने सर्वाधिक २७ धावांत ३ बळी घेतले.

20:50 November 21

न्यूझीलंडसमोर विजयासाठी 20 षटकात 185 धावांचे तगडे आव्हान

भारताने निर्धारित 20 षटकात 7 बाद 184 धावा केल्या. अडम मिल्ने याने टाकलेल्या अखेरच्या षटकात दीपक चहर व अक्षर पटेल जोडीने 19 धावा लुटल्या. चहरने केवळ 8 चेंडूत 1 षटकार व 2 चौकारांसह 21 धावा करून भारताला मजबूत धावसंख्या करुन दिली. 

20:25 November 21

भारताला सहावा धक्का.. श्रेयस अय्यर बाद

श्रेयस अय्यने 20 चेंडूत 25 धावा केल्या. यामध्ये दोन चौकारांचा समावेश आहे. मिल्नेच्या गोलंदाजीवर मिशेलने त्याचा झेल टिपला.

20:22 November 21

भारताला पाचवा धक्का.. व्यंकटेश अय्यर 20 धावांवर बाद

व्यंकटेश अय्यरने 15 चेंडूत 1 चौकार व एका षटकाराच्या मदतीने 20 धावा केल्या. बोल्टच्या गोलंदाजीवर चॅपमनने त्याचा झेल टिपला.

20:01 November 21

भारताला चौथा धक्का. रोहित शर्मा बाद

रोहित शर्मा 56 धावांवर बाद झाला. रोहित शर्माने 31 चेंडूत 3 षटकार व 5 चौकारांच्या मदतीने 56 धावा केल्या. त्याने टी-20 कारकिर्दीत 150 षटकार खेचण्याचा पराक्रम केला. ईश सोदीने आपल्याच गोलंदाजीवर रोहितचा अप्रतिम झेल घेतला. 

19:47 November 21

भारताला तिसरा धक्का रिषभ पंत माघारी

रिषभ पंत केवळ चार धावा काढून तंबूत परतला. सँटेनरच्या गोलंदाजीवर निशामने त्याचा झेल घेतला. 

19:38 November 21

भारताला दुसरा धक्का, सुर्यकुमार शुन्यावर बाद

सुर्यकुमार आजच्या सामन्यातही अपयशी ठरला. त्याने केवळ चार चेंडू खेळले व भोपळाही न फोडता बाद झाला. सॅटेनरच्या गोलंदाजीवर गप्टीलने त्याचा अप्रतिम झेल घेतला. 

19:36 November 21

भारताला पहिला धक्का, इशान किशन बाद

सातव्या षटकात भारताला पहिला धक्का बसला. सलामीवीर इशान किशन 21 चेंडूत 29 धावा काढून बाद झाला. सॅटेनरने इशानचा बळी घेतला. 

19:30 November 21

सहा षटकात भारत बिनबाद 69 धावा

पहिल्या पॉवर प्लेमध्ये भारताने चांगली सुरुवात केली असून 6 षटकात बिनबाद 69 धावा केल्या आहेत. रोहित शर्माने 17 चेंडूत तान षटकार व चार चौकारांच्या मदतीने 39 धावा तर इशान किशनने 19 चेंडूत सहा चौकारांच्या मदतीने नाबाद 29 धावा केल्या आहेत. 

19:08 November 21

रोहित शर्मा- इशान किशन सलामी जोडी मैदानात

के.एल राहुलच्या जागी संघात स्थान मिळालेला इशान किशन आज रोहित शर्मासोबत सलामीला आला. पहिल्याच षटकात रोहितने दोन खणखणीत चौकार खेचत संघाला चांगली सुरूवात केली. बोल्टने टाकलेल्या पहिल्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर रोहितला स्लीपमध्ये जीवदान मिळाले व चेंडू सीमापार गेला. 

19:08 November 21

भारतीय संघात दोन बदल तर साउदीच्या जागी सॅटनर करणार किवींचे नेतृत्व

कर्णधार रोहित शर्माने केएल राहुल आणि आर अश्विनच्या जागी इशान किशन आणि युझवेंद्र चहलचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश केला. त्याचबरोबर न्यूझीलंडच्या संघात टिम साऊदीच्या जागी लॉकी फर्ग्युसनला संधी देण्यात आली असून आज मिचेल सँटनर संघाचे नेतृत्व करत आहे.

18:46 November 21

नाणेफेक जिंकून भारतीय संघाचा प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय

कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याची निर्णय घेतला आहे. ईडन गार्डनची खेळपट्टी फिरकीस अनुकूल असल्याचे मानले जात आहे. 

18:23 November 21

टीम इंडिया नवोदित खेळाडूंना देणार संधी

न्यूझीलंड विरुद्ध खेळल्या जात असलेल्या तीन टी-20 सामन्याच्या मालिकेतील पहिले दोन सामने जिंकून भारतीय संघाने विजयी आघाडी घेतली आहे. त्यामुळे आजच्या शेवटच्या टी-20 सामन्यात भारतीय संघ नवोदित व राखीव खेळाडूंना संधी देण्याची शक्यता आहे. आजच्या सामन्यात ऋतुराज गायकवाड़ (Ruturaj Gaikwad), आवेश खान (Avesh Khan) आणि ईशान किशन (Ishan Kishan) यांना संधी दिली जाऊ शकते. 

18:22 November 21

दोन्ही संघाची प्लेईंग इलेव्हन

न्यूझीलंड टीम -

 टिम सीफर्ट (विकेटकीपर), टिम साउथी (कप्तान), मार्टिन गप्टिल, डेरिल मिशेल, मार्क चॅपमन, ग्लेन फिलिप्स, रचिन रवींद्र, मिशेल सेंटनर, टॉड एस्टल, लॉकी फर्ग्यूसन, ट्रेंट बोल्ट, एडम मिल्ने, ईश सोढ़ी, जेम्स नीशम।

भारतीय टीम -

 रोहित शर्मा (कप्तान), रिषभ पंत (विकेटकीपर), केएल राहुल, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, वेंकटेश अय्यर, अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, भुवनेश्वर कुमार, दीपक चाहर, मोहम्मद सिराज, युजवेंद्र चहल, हर्षल पटेल, अवेश खान, ईशान किशन , ऋतुराज गायकवाड़।

18:17 November 21

भारत-न्यूझीलंड तिसरा टी-20 सामना

कोलकाता - भारत-न्यझीलंड संघांदरम्यान खेळल्या जात असलेल्या तीन टी-20 सामन्याच्या मालिकेतील तिसरा व अंतिम टी-20 सामना कोलकाता येथील ईडन गार्डन मैदानावर खेळला जाणार आहे. भारतीय संघाने घरच्या मैदानावर न्यूझीलंडविरुद्ध टी-२० मालिका जिंकली असून आता संघाच्या नजरा क्लीन स्वीपवर लागल्या आहेत. कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर होणाऱ्या या सामन्यात भारताचा कर्णधार रोहित शर्मा आता अशा खेळाडूंना संधी देऊ इच्छितो ज्यांना आतापर्यंत खेळण्याची संधी मिळाली नाही. कर्णधार झाल्यानंतर रोहितची ही पहिलीच मालिका आहे. आज होणाऱ्या तिसऱ्या ट्वेन्टी-२० क्रिकेट लढतीमध्ये विजय मिळवून मालिकेत निर्भेळ यश संपादन करण्याचे भारतीय संघाचे लक्ष्य आहे.

रोहित शर्माने ईडन गार्डन्सवरच एकदिवसीय क्रिकेटमध्ये २६४ धावा केल्या होत्या आणि कर्णधार म्हणून येथे पहिली मालिका ३-० ने जिंकण्याची संधी त्याच्याकडे असणार आहे. त्यानंतर आठवडाभरात न्यूझीलंडविरुद्धची कसोटी मालिका सुरू होणार आहे.

Last Updated : Nov 21, 2021, 10:45 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details