नवी दिल्ली ICC T20 Ranking :आयसीसीनं नवी टी 20 क्रमवारी जाहीर केली आहे. ताज्या क्रमवारीनुसार, भारतीय संघाचा डावखुरा फलंदाज यशस्वी जयस्वाल आणि फिरकी गोलंदाज अक्षर पटेल यांच्या रॅंकिंगमध्ये मोठी सुधारणा झाली.
सूर्यकुमार यादव अजूनही अव्वल स्थानी : यशस्वी जयस्वाल सात स्थानांची झेप घेत सहाव्या स्थानावर पोहोचला आहे. जयस्वाल याच्या कारकिर्दीतील हे सर्वोच्च मानांकन आहे. जयस्वालचे सध्या टी 20 मध्ये 739 रेटिंग गुण आहेत. टीम इंडियाचा धडाकेबाज फलंदाज सूर्यकुमार यादव अजूनही 869 गुणांसह अव्वल स्थानावर आहे.
बाबर आझमच्या क्रमवारीत सुधारणा :अफगाणिस्तानविरुद्धच्या दुसऱ्या टी 20 सामन्यात यशस्वीनं झटपट अर्धशतक झळकावलं होतं. त्यानं 34 चेंडूत 68 धावा ठोकल्या. जयस्वालसोबतच पाकिस्तान संघाचा फलंदाज बाबर आझमच्या क्रमवारीतही सुधारणा झाली आहे. न्यूझीलंडविरुद्ध लागोपाठ तीन अर्धशतक झळकवल्यानंतर बाबर आझम पाचव्या स्थानावरून तिसऱ्या स्थानावर पोहोचला.
अक्षर पटेलची झेप : भारताचा फिरकी गोलंदाज अक्षर पटेलनंही गोलंदाजांच्या क्रमवारीत टॉप 5 मध्ये स्थान मिळवलं आहे. तो 667 गुणांसह पाचव्या स्थानावर आहे. अक्षर पटेलच्या कारकिर्दीतील ही सर्वोत्तम रँकिंग आहे. अफगाणिस्तानविरुद्धच्या टी 20 मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांमध्ये त्यानं चांगली कामगिरी करत 4 विकेट घेतल्या.
रवी बिश्नोईच्या क्रमवारीत घसरण : जर आपण टी 20 मधील नंबर वन गोलंदाजाबद्दल बोललो, तर इंग्लंडचा फिरकी गोलंदाज आदिल रशीद 726 गुणांसह पहिल्या क्रमांकावर आहे. वेस्ट इंडिजचा अकिल हुसेन 683 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. मात्र, भारतीय फिरकी गोलंदाज रवी बिश्नोईच्या क्रमवारीत घसरण झाली असून तो सहाव्या स्थानावर पोहोचला आहे.
हे वाचलंत का :
- प्रज्ञानानंदनं विश्वविजेत्या डिंग लिरेनला हरवलं, विश्वनाथन आनंदला मागे टाकून बनला नंबर 1 खेळाडू
- ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये सुमित नागलचा मोठा उलटफेर, 27व्या मानांकीत खेळाडूचा पराभव करत दुसऱ्या फेरीत धडक
- इंग्लंड विरुद्ध कसोटी मालिकेसाठी अजिंक्य रहाणेला डच्चू, जाणून घ्या काय म्हणाला अजिंक्य