साउथम्पटन - भारत आणि न्यूझीलंड यांच्यात साउथम्पटनच्या एजेस बाउल स्टेडियममध्ये जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना खेळला जात आहे. या सामन्यावर पावसाचे सावट आहे. पावसामुळे पहिल्या दिवसाचा खेळ वाया गेला. त्यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी देखील खराब प्रकाशमानामुळे कमी षटकांचा खेळ झाला. आज सामन्याचा चौथा दिवस आहे. पावसामुळे अद्याप खेळ सुरू झालेला नाही. यामुळे न्यूझीलंडचे खेळाडू टेबल टेनिस खेळताना पाहायला मिळाले.
न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने खेळाडू टेबल टेनिस खेळतानाचे फोटो शेअर केले आहेत. यात न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज काइल जेमिसन टेबल टेनिस खेळताना पाहायला मिळत आहे. जेमिसनच्या या फोटोवर भरभरून कमेंट येत आहेत. काहींनी कमीत कमी टेबल टेनिसचा लाईव्ह सामना तर दाखवा असे म्हणत आयसीसीचा चिमटा काढला आहे.
काइल जेमिसन भारतासाठी कर्दनकाळ -
काइल जेमिसनच्या भेदक माऱ्यासमोर भारतीय फलंदाजांनी लोटांगण घातलं. भारताचा पहिला डाव २१७ धावांवर आटोपला. यात जेमिसनने २२ षटके फेकत ३१ धावांत ५ गडी बाद केले. २६ वर्षीय गोलंदाजांने यात तब्बल १२ षटके निर्धाव फेकली. त्याने रोहित शर्मा, विराट कोहली, ऋषभ पंत, इशांत शर्मा आणि जसप्रीत बुमराह यांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. या कामगिरीसह जेमिसनने इतिहास रचला. तो जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत सर्वाधिक वेळा एका डावात ५ गडी बाद करणारा गोलंदाज ठरला. त्याने भारताचा आर. अश्विन, अक्षर पटेल आणि ऑस्ट्रेलियाचा नॅथन लिओनला मागे टाकलं. या सर्वांनी प्रत्येकी ४-४ वेळा अशी कामगिरी केली आहे. तर जेमिसनने ५ वेळा ही किमया साधली.
हेही वाचा -WTC Final : भारतीय गोलंदाज फायनलमध्ये का अपयशी? दिग्गजाने सांगितले कारण
हेही वाचा -WTC Final : चौथ्या दिवसांचा खेळ होणार की नाही, दिनेश कार्तिकने दिले अपडेट