मुंबई - आयपीएल 2021 च्या उर्वरित हंगामाला सुरूवात होण्याआधीच सनरायझर्स हैदराबाद, पंजाब किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स संघाला मोठा धक्का बसला आहे. सनरायझर्स हैदराबाद संघाचा सलामीवीर जॉनी बेअरस्टो, राजस्थान रॉयल्सचा जोस बटलर आणि पंजाब किंग्सच्या डेविड मलान यांनी आयपीएलच्या उर्वरित हंगामातून माघार घेतली आहे.
डेविड मलान याने माघार घेतल्याची माहिती पंजाब किंग्स संघाने ट्विट करत दिली. त्याने टी-२० विश्वकरंडक स्पर्धा आणि अॅशेस मालिकेपूर्वी कुटुंबीयांना वेळ देता यावा, यासाठी आयपीएलमधून माघार घेतल्याचे सांगितलं. त्याच्या जागी एडन मार्कराम पंजाब किंग्सकडून खेळणार आहे.
जॉनी बेअरस्टो होता फॉर्मात
जॉनी बेअरस्टो सनरायझर्स हैदराबाद संघाचा सलामीवीर फलंदाज आहे. तो आयपीएल 2021 च्या पहिल्या सत्रात तुफान फॉर्मात होता. त्याने 7 सामन्यात 248 धावा केल्या होत्या. यात दोन अर्धशतकाचा समावेश आहे. त्याच्या माघारीमुळे सनरायझर्सला मोठा धक्का बसला आहे.
राजस्थान रॉयल्सचा स्फोटक खेळाडू बेन स्टोक्स आणि जोफ्रा आर्चर खेळणार नाहीत. आता जोस बटलर देखील उर्वरित हंगामात खेळणार नाही. यामुळे राजस्थानच्या अडचणीत वाढ झाली आहे. बेअरस्टो आणि बटलर याने माघारीचे कारण फ्रेंचायझींना कळवले आहे. परंतु ते अद्याप पुढे आलेले नाही. दरम्यान, आयपीएलच्या उर्वरित हंगामाला 19 सप्टेंबरपासून सुरूवात होणार आहे.
हेही वाचा -ENG vs IND: पैसा आणि IPL मुळे मँचेस्टर कसोटी रद्द करण्यात आली, मायकल वॉनचा गंभीर आरोप
हेही वाचा -IPL 2021 : भारताच्या सर्व खेळाडूंचे अहवाल कोरोना निगेटिव्ह, खेळाडू यूएईला रवाना