मुंबई - आयपीएल २०२१ आज कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना होणार आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये होणाऱ्या या सामन्याआधी राजस्थान संघाला एक मोठा धक्का बसला आहे. राजस्थान आणि इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर आयपीएल २०२१च्या हंगामात खेळू शकणार नाही. इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्डाने (ईसीबी) शुक्रवारी याची माहिती दिली.
जोफ्रा आर्चरला भारतीय दौऱ्यात दुखापत झाली होती. यामुळे त्याला आयपीएलच्या सुरुवातीच्या सामन्यातून बाहेर बसावे लागले होते. मात्र, आता इंग्लंड क्रिकेट बोर्डाने तो भारतात येणार नसल्याचे सांगितले आहे. आर्चरचा काउंटी क्लब ससेक्स त्यांच्या वैद्यकीय प्रगतीचा आढावा घेणार आहे.
ईसीबीने आर्चरबाबत सांगितले आहे की, आर्चर आता पुढच्या आठवड्यात सुरू होणाऱ्या प्रशिक्षण सत्राचा पाठपुरावा करणार आहे. ससेक्स संघासोबत तो पूर्ण प्रशिक्षण घेईल. जर तो गोलंदाजी करू शकत असेल तर पुढील पंधरवड्यात त्याच्याकडून क्रिकेटमध्ये पुनरागमन होणे अपेक्षित आहे. तो खेळू लागल्यावर ईसीबी पुष्टी करेल.