मुंबई : मुंबईतील डॉ. डी. वाय. पाटील स्पोर्ट्स अकादमीमध्ये महिला प्रीमियर लीग (WPL) च्या पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने गुजरात जायंट्सची दारूण पराभव केला आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील मुंबईने गुजरातवर 143 धावांच्या मोठ्या फरकाने विजय मिळवला आहे. हा महिला टी 20 इतिहासातील धावांच्या फरकाने नोंदवलेला सर्वात मोठा विजय आहे. यापूर्वीचा विक्रम वेलिंग्टन महिला संघाच्या नावावर होता, ज्यांनी २४ जानेवारी रोजी वेलिंग्टन येथे ओटागो महिला संघाचा 122 धावांनी पराभव केला होता.
हरमनप्रीतची कप्तानी खेळी : प्रथम फलंदाजी करताना मुंबई इंडियन्सने पाच गडी गमावून 207 धावांची मजल मारली. कर्णधार हरमनप्रीत कौरने 22 चेंडूत अर्धशतक झळकावून आघाडीचे नेतृत्व केले. स्नेह राणाने तिला बाद करण्यापूर्वी तिने 30 चेंडूत 14 चौकारांसह 65 ठोकल्या होत्या. हेली मॅथ्यूजने 31 चेंडूत 47 धावा करत मुंबईच्या डावाला आकार दिला. तर अमेलिया केरने 24 चेंडूत नाबाद 45 धावा करत संघाची धावसंख्या 200 च्या पार नेली. तिने हरमनप्रीतसोबत 89 धावांची भागीदारीही केली. इस्सी वोंगने स्नेह राणाला शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकून मुंबईचा डावाचा दिमाखात अंत केला. राणाने 43 धावांच्या मोबदल्यात दोन विकेट घेतल्या.