नवी दिल्ली - नुकत्याच सुरू झालेल्या विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत तामिळनाडू आणि पंजाब यांच्यात पहिला सामना खेळला गेला. यात पंजाबचा फलंदाज गुरकीरत सिंगने उत्कृष्ट फलंदाजी करताना शतक ठोकले. मात्र, तामिळनाडूने हा सामना ६ गड्यांनी जिंकला.
विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा सदस्य राहिलेला आणि यंदाच्या आयपीएल लिलावात 'अनसोल्ड' गेलेल्या गुरकीरतने शतक ठोकत फ्रेंचायझींना आपला चांगला फॉर्म दाखवला. त्याने १२१ चेंडूंत १४ चौकार आणि ७ षटकारांच्या मदतीने १३९ धावा केल्या. पंजाब संघाने ३० धावांत २ गडी गमावले असताना गुरकीरत मैदानात आला. अभिषेक शर्मा ५ आणि कर्णधार मनदीप अवघ्या ३ धावांवर तंबूत परतला, तेव्हा गुरकीरतने मोर्चा सांभाळला. त्याने सलामीवीर सिमरन सिंगबरोबर ११६ धावांची भागीदारी केली.