नवी दिल्ली : इंडियन प्रीमियर लीग 2023 मध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळणारा डावखुरा फलंदाज तिलक वर्मा याने त्याच्या आकर्षक फलंदाजीने सर्वांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले आहे. आता त्याचा लवकरच भारतीय संघातही समावेश होण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे. मूळचा हैदराबादचा असलेल्या या फलंदाजाने आयपीएलच्या या मोसमात मुंबई इंडियन्ससाठी सर्वाधिक धावा केल्या आहेत. तसेच, त्याने आपल्या संघासाठी या मोसमात सर्वाधिक षटकार देखील मारले आहेत.
दिग्गज खेळाडूंच्या उपस्थितीत संघात छाप सोडली : तिलक वर्माने आयपीएल 2023 मध्ये आतापर्यंत खेळलेल्या पाच सामन्यांतील पाच डावात एकूण 214 धावा केल्या आहेत. यापैकी एका सामन्यात तो नाबाद राहिला आहे. या दरम्यान त्याने आपल्या संघासाठी 17 चौकार आणि सर्वाधिक 14 षटकार मारले आहेत. अनेक दिग्गज खेळाडूंच्या उपस्थितीतही तिलक वर्मा मुंबई इंडियन्ससाठी सातत्याने चांगली कामगिरी करून सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. मुंबई इंडियन्सच्या संघात सूर्यकुमार यादव, रोहित शर्मा आणि ईशान किशन यांच्यासारख्या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या खेळाडूंचा समावेश असूनही तिलक वर्माने आपल्या प्रदर्शनाने एक अनोखी छाप सोडली आहे. तिलक वर्माने मुंबईसाठी केवळ सर्वाधिक धावाच केल्या नसून त्याचा फलंदाजीचा स्ट्राईक रेटही संघात सर्वाधिक आहे. त्याने मुंबई इंडियन्ससाठी या सीझनमध्ये 135 चेंडूत 214 धावा केल्या आहेत. या दरम्यान त्याने 158.51 च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी केली आहे.