नवी दिल्ली -अत्यंत चुरशीच्या झालेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने पंजाब किंग्सवर दोन धावांनी विजय मिळवला. पंजाब किंग्सला जिंकण्यासाठी शेवटच्या षटकात केवळ चार धावांची गरज होती. पण, राजस्थानचा गोलंदाज कार्तिक त्यागीने एक धाव देत व दोन गडी बाद करत सामना आपल्या बाजूने फिरवला. या सामन्यात राजस्थान रॉयल्सने प्रथम फलंदाजी करताना 185 धावा केल्या. पंजाबला विजयासाठी 186 धावांचे आव्हान मिळाले होते. पंजाबकडून अर्शदीप सिंगने 32 धावा देत 5 बळी टिपले. प्रत्युत्तरात पंजाबचे सलामीवीर केएल राहुल व मयांक अगरवाल यांनी 120 धावांची दमदार भागीदारी केली. मयांकने अर्धशतकी खेळी केली. शेवटच्या षटकात घडलेल्या नाट्यमय घडामोडीनंतर पंजाबला 20 षटकांत 182 धावाच करता आल्या.
पंजाब किंग्सचा कर्णधार केएल राहुल याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याच्या निर्णय घेतला होता. राजस्थान रॉयल्सच्या संघाचे सलामीवीर यशस्वी जैस्वाल (49) आणि नंतर आलेल्या महिपाल लोमरोर (43) यांच्या स्फोटक खेळीच्या जोरावर राजस्थानने पंजाबसमोर विजयासाठी 186 धावांचे आव्हान ठेवले. पंजाबकडून अर्शदीप सिंगने सर्वाधिक 5 गडी तर मोहम्मद शमीने तीन गडी बाद केले. इशान पोरेल और हरप्रीत बरार प्रत्येकी एक गडी तंबूत पाठवला.
शेवटच्या षटकात फिरला सामना
राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनने शेवटचे षटक कार्तिक त्यागीला दिले. त्यागीने शेवटच्या षटकातील पहिल्या चेंडूत एकही धाव दिले नाही. त्यागीच्या दुसऱ्या चेंडूत एडेन मार्करामने धाव घेतला. तिसऱ्या चेंडूत सॅमसनने झेल घेत निकोलस पूरनला तंबूत पाठवले. त्यानंतर दीपक हुड्डा फलंदाजीसाठी मैदानात उतरला व चौथ्या चेंडूत त्यागीने धाव काढू दिले नाही. पाचव्या चेंडूत सॅमनने झेल घेत हुड्डाला बाद केले. शेवटचा चेंडू खेळण्यासाठी फॅबियन एलन मैदानात आला पण त्यालाही धाव काढता आले नाही. अशाप्रकारे शेवटच्या षटकात त्यागीच्य गोलंदाजीमुळे सामना फिरला आणि राजस्थान रॉयल्सने सामना जिंकला.