नवी दिल्ली -आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळलेल्या डेल स्टेनने आपल्या वक्तव्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे. आयपीएलमध्ये क्रिकेटपेक्षा पैशाला महत्त्व दिले जाते. त्यामुळे पाकिस्तान सुपर लीग आणि श्रीलंका सुपर लीग आयपीएलपेक्षा अधिक फायदेशीर आहे, अशा आशयाचे वक्तव्य स्टेनने केले होते. या वक्तव्यानंतर स्टेन सोशल मीडियावर टीकेचा धनी ठरला होता. आता स्टेनने या वक्तव्याबद्दल माफी मागितली आहे.
“माझ्या कारकिर्दीत आयपीएल उत्कृष्ट आहे, इतर खेळाडूंसाठीही. इतर लीगशी तुलना करण्याचा, अपमान करण्याचा माझा हेतू नव्हता. सोशल मीडियावर शब्दांना अतिशयोक्ती करून वापरले जाते. जर मी कोणालाही निराश केले असेल, तर मी त्याबद्दल माफी मागतो", असे स्टेनने एका ट्वीटमध्ये लिहिले आहे.
काय म्हणाला होता स्टेन?
स्टेनने पाकिस्तानच्या पीएसएल आणि श्रीलंकेच्या लंका प्रीमियर लीगला एक आकर्षक स्पर्धा म्हटले. तो म्हणाला, ''जेव्हा तुम्हाला पीएसएल किंवा एलपीएलमध्ये खेळता, तेव्हा तिथे क्रिकेटवा महत्त्व दिले जाते. मला इथे येऊन काही दिवस झाले आहेत आणि लोक मला माझ्या खेळाविषयी विचारत आहेत. आयपीएलमध्ये या गोष्टी विसराव्या लागतात. तिथे कोण किती कमावते, याकडे लक्ष असते. हे एक कटू सत्य आहे. मी अशा गोष्टींपासून दूर राहू इच्छितो. कारण, मला खेळाकडू अधिक लक्ष द्यायचे आहे.''
इतर लीग खेळायच्या असल्यामुळे स्टेनने यंदाच्या आयपीएलमध्ये न खेळण्याचा निर्णय घेतला. स्टेनने ९५ आयपीएल सामन्यांत ९७ बळी घेतले आहेत. ८ धावांत ३ बळी ही स्टेनची सर्वोत्तम आयपीएल कामगिरी आहे. दुखापतीमुळे गेल्या तीन आयपीएल मोसमात तो फक्त १२ सामने खेळू शकला आहे.
हेही वाचा - एकाच षटकात ५ षटकार ठोकणारा खेळाडू फिटनेस टेस्टमध्ये 'फेल'!