मुंबई :मुंबईतील सिद्धिविनायक गणेश आपल्या प्रत्येक भक्ताचा प्रार्थनेला धावून येतो. नवसाला पावणाऱ्या गणपतीपैकी एक आहेत मुंबईतील सिद्धिविनायक गणपती बाप्पा. मुंबईतील सामान्य माणूस असो किंवा मोठा उद्योगपती किंवा सिनेअभिनेता तो बाप्पांच्या चरणी येतो आणि आपली प्रार्थना बाप्पाला सांगतो. दु:ख निवारणारा दु:खहर्ता गणपती आपल्या भक्तांवरील संकट दूर देखील करत असतो. अंबानी कुटुंबीयदेखील बाप्पांचे दर्शन घ्यायला नेहमी येत असतात. याचमुळे अंबानी कुटुंबीय आयपीएलमध्ये मुबंई इंडियन्सचा संघ अंतिम फेरीत जावा यासाठी मुकेश अंबानी आपल्या कुटुंबासह बाप्पांच्या चरणी आले. परंतु गुजरात संघाने मुंबई इंडियन्सचा पराभव केला.
संघाच्या विजयासाठी बाप्पांच्या चरणी : आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे मालक मुकेश अंबानी हे मुंबई इंडियन्स संघाचे मालक आहेत. मुकेश अंबानी आणि मुलगा आकाश अंबानी आणि त्यांची सून यांनी मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिरात जाऊन मुंबई संघाच्या विजयासाठी प्रार्थना केली. गेल्या तीन वेळा हे कुटुंब मुंबई इंडियन्सच्या प्रत्येक आयपीएल सामन्यापूर्वी सिद्धिविनायक मंदिरात जाताना दिसले आहे. लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध संघाच्या एलिमिनेटर सामन्यापूर्वी बुधवारी शेवटची भेट झाली. जिथे मुंबई इंडियन्सने 81 धावांनी विजय मिळवला होता. दरम्यान यावेळी मुकेश अंबानी व्यतिरिक्त त्यांची सून श्लोका मेहता, नातू पृथ्वी अंबानी, मुले आकाश आणि अनंत अंबानी हेही होते. परंतु अंबानी कुटुंबियांची प्रार्थना गणपती बाप्पाने स्वीकारली नाही. कारण गुजरात टायटन्सने मुंबई संघाचा 61 धावांनी दारुण पराभव केला.