नवी दिल्ली :आयपीएल 2023 मध्ये काल मुंबई इंडियन्सने आपल्या तिसऱ्या सामन्यात दिल्लीचा 6 गडी राखून पराभव केला. मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा आणि तिलक वर्मा या दोघांनी या विजयाचा आनंद साजरा केला आहे. सोशल मीडियावर एक व्हिडिओ ट्रेंड होत आहे. यामध्ये रोहित शर्मा आणि तिलक वर्मा यांनी आयपीएलच्या 16 व्या हंगामातील त्यांच्या पहिल्या विजयाचा अनुभव शेअर केला आहे.
रोहित शर्मा आणि तिलक वर्मा मुंबई इंडियन्सने पोस्ट केला व्हिडिओ : मुंबई इंडियन्सच्या संघाने त्यांच्या ट्विटर अकाउंटवरून रोहित शर्मा आणि तिलक वर्मा यांच्या मुलाखतीचा व्हिडिओ शेअर केला आहे. यात कर्णधार रोहित शर्मा तिलक वर्माला विचारतो की, 'तिलक, आज सामना जिंकल्यावर तुला कसं वाटतंय?' त्यावर प्रतिक्रिया देताना तिलक वर्मा म्हणतो की, 'हा खूप चांगला अनुभव होता. मी वर्षभरापासून तुमच्यासोबत एकदा तरी फलंदाजीची वाट पाहत होतो. अखेर यावेळी मला ही संधी मिळाली. मला तुमच्यासोबत भागीदारी करताना फार आनंद झाला, कारण तुमच्यासोबत फलंदाजी करणं हे माझं लहानपणापासूनचं स्वप्न होतं.
कालच्या सामन्यात तिलकची उत्कृष्ट खेळी : 11 एप्रिल रोजी दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर झालेल्या सामन्यात तिलक वर्माने 29 चेंडूत 1 चौकार आणि 4 षटकार लगावत 41 धावा केल्या होत्या. रोहितने तिलकला पुढे विचारले की, तू एका षटकात 16 धावा मारल्या. त्यासाठी तुझं काय प्लॅनिंग होतं? यावर उत्तर देताना तिलकने, त्यासाठी डोके स्थिर आणि पाया मजबूत ठेवण्यावर पूर्ण लक्ष केंद्रित केल्याचे सांगितले. व्हिडिओच्या शेवटी रोहित शर्माने तिलक वर्माला, तुझ्याशी संवाद साधताना खूप मजा आली, असे म्हटले.
तिलक वर्माची क्रिकेट कारकीर्द : 20 वर्षीय तिलक वर्मा हा एक उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू आहे. तो हैदराबादचे रहिवासी आहे. तिलक हैदराबादच्या 19 वर्षांखालील संघाकडूनही खेळला आहे. 2022 च्या आयपीएल लिलावात मुंबई इंडियन्सने तिलक वर्माला 1.7 कोटी रुपयांना विकत घेतले होते. आयपीएल 2022 मध्ये त्याने मुंबई संघासाठी पदार्पण केले. आपल्या पहिल्याच आयपीएलमध्ये त्याने 14 सामन्यांच्या 14 डावात 397 धावा ठोकल्या. त्यात 2 अर्धशतकांचा देखील समावेश होता.
हेही वाचा :IPL 2023 : राहुल तेवतियानेही अखेरच्या चेंडूवर षटकार मारून जिंकवला होता सामना! जाणून घ्या काय घडले होते त्या सामन्यात