नवी दिल्ली :काल झालेल्या आयपीएलच्या 9 व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने आरसीबीचा मोठ्या फरकाने पराभव केला. केकेआरच्या दिग्गज खेळाडूंनी हा विजय मिळवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. पण या खेळाडूंशिवाय एक 19 वर्षीय नवख्या गोलंदाजाने सर्वांनाच प्रभावित केले. या गोलंदाजाने आयपीएलच्या पदार्पण सामन्यातच आरसीबीच्या फलंदाजांना नाकीनऊ आणले.
पदार्पणाच्या सामन्यात 3 बळी घेतले : दिल्लीचा रहिवासी असलेला सुयश शर्मा केवळ 19 वर्षांचा आहे. 6 एप्रिल रोजी खेळल्या गेलेल्या आयपीएलच्या 9 व्या सामन्यात त्याने चांगली कामगिरी केली आहे. या सामन्यात कर्णधार नितीश राणाच्या कोलकाता नाईट रायडर्सने सुयशला पदार्पणाची संधी दिली. सुयशचा केकेआरच्या संघात इम्पॅप्ट प्लेअर म्हणून समावेश करण्यात आला होता. या सामन्यात सुयशने व्यंकटेश अय्यरची जागा घेतली आणि आपल्या पहिल्या सामन्यातच तो चमकला. आयपीएलच्या या सिझनमध्ये केकेआरच्या विजयाची मोहीम सुरू करण्यात सुयश शर्माची मुख्य भूमिका आहे. सुयशने आरसीबीविरुद्धच्या पदार्पणाच्या सामन्यात 3 बळी घेतले.