शारजाह -आयपीएल 2021 मधील 44वा सामना सनरायझर्स हैदराबाद आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात रंगला. चेन्नईने नाणेफेक जिंकून हैदराबादला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. तेव्हा हैदराबादने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 7 बाद 134 धावा केल्या आहेत. चेन्नईने हैदराबादवर ६ गडी आणि २ चेंडू राखून विजय मिळवला आहे. हैदराबादनं दिलेलं १३५ धावांचं आव्हान चेन्नईने ४ गडी गमवून गाठले. वृद्धीमान साहाने सर्वाधिक 44 धावांचे योगदान दिले.
चेन्नईने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तेव्हा जेसन रॉय आणि वृद्धीमान साहा या जोडीने सावध सुरूवात केली. दोघांनी 3.3 षटकात 23 धावांची सलामी दिली. मागील सामन्यात अर्धशतक झळकावणाऱ्या रॉयला हेझलवूडने धोनीकडे झेल (2) देण्यास भाग पाडले. यानंतर आलेला केन विल्यमसन ड्वेन ब्राव्होचा शिकार ठरला. त्याने 11 धावांचे योगदान दिले.
प्रियम गर्ग (7) देखील मोठी खेळी करू शकला नाही. त्याला देखील ब्राव्होने बाद केले. दुसरी बाजू साहाने लावून धरली होती. त्याला रविंद्र जडेजाने धोनीकरवी झेलबाद करत हैदराबादला बॅकफूटवर ढकलले. साहाने 46 चेंडूत 1 चौकार आणि 2 षटकासासह 44 धावांचे योगदान दिले.
साहा बाद झाल्यानंतर अभिषेक शर्मा आणि अब्दुल समद जोडीने संघाला शंभरीपार केले. हेजलवूडने 17व्या षटकात हैदराबादला दोन धक्के दिले. त्याने तिसऱ्या चेंडूवर अभिषेकला (18) बाद केले. यानंतर त्याने पाचव्या चेंडूवर अब्दुल समदची विकेट घेतली. हाणामारीच्या षटकात जेसन होल्डर (5) ठाकूरच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्याचा झेल दीपक चहरने घेतला.
राशिद खान (नाबाद 12) आणि भुवनेश्वर कुमार (2) जोडीने हैदराबादला 134 पर्यंत मजला मारून दिली. चेन्नईकडून जोस हेझलवूडने सर्वाधिक 3 गडी बाद केले. तर ब्राव्होने 2 तर ठाकूर आणि जडेजाला प्रत्येकी 1-1 विकेट मिळाली.