लखनौ : लखनौ सुपर जायंट्सने सनरायझर्स हैदराबादवर 5 गड्यांनी शानदार विजय मिळवला आहे. हैदराबादने दिलेले 122 धावांचे आव्हान लखनौने 16 षटकांत 5 गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केले. लखनौकडून कर्णधार केएल राहुलने सर्वाधिक 35 धावा केल्या. तर हैदराबादकडून अदिल रशीदने 2 विकेट घेतल्या. क्रुनाल पंड्याने सामन्यात अष्टपैलू कामगिरी केली. त्याने प्रथम गोलंदाजी करताना 4 षटकांत केवळ 18 धावा देत 3 विकेट घेतल्या. त्यानंतर त्याने फलंदाजीतही कमाल दाखवली. त्याने 23 चेंडूत धडाकेबाज 34 धावा ठोकल्या.
क्रुनाल पंड्याची धडाकेबाज फलंदाजी : सलामीवीर काइल मेअर्स या सामन्यात आपली छाप सोडू शकला नाही. त्याला 13 धावांवर फारुकीने मयंक अगरवालच्या हातून झेलबाद केले. त्यानंतर आलेला दीपक हुड्डाही स्वस्तात तंबूत परतला. त्याला भुवनेश्वरने बाद केले. चौथ्या क्रमांकावर आलेल्या क्रुनाल पंड्याने एका टोकाने धडाकेबाज फलंदाजी केली. त्याने 23 चेंडूत 34 धावा ठोकल्या. त्याला उमरान मलिकने अनमोलप्रीत सिंहच्या हातून झेलबाद केले.
लखनौच्या फिरकीपटूंची कमाल : प्रथम फलंदाजी करताना लखनौच्या फिरकीपटूंसमोर हैदराबादची फलंदाजी ढेपाळली. हैदराबादने 20 षटकांत 8 गड्यांच्या मोबदल्यात 121 धावा केल्या. सलामीवीर मयंक अगरवाल 8 धावांवर बाद झाला. त्याला क्रुनाल पंड्याने स्टॉयनिसच्या हातून झेलबाद केले. त्यानंतर आलेल्या कर्णधार एडन मार्करमला क्रुनालनेच पहिल्या चेंडूवर बाद केले. हॅरी ब्रुकही काही कमाल दाखवू शकला नाही. त्याला 3 धावांवर रवी बिश्नोईने पूरनच्या हातून झेलबाद केले. अनमोलप्रीत सिंहने थोडा संघर्ष केला. मात्र त्यालाही क्रुनाल पंड्याने 31 धावांवर एलबीडब्लू आउट केले. सनरायझर्सचा एकही फलंदाज मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला. क्रुनालने 3 तर अमित मिश्राने 2 विकेट घेतल्या.
दोन्ही संघाची प्लेइंग 11 : सनरायझर्स हैदराबाद -मयंक अगरवाल, अनमोलप्रीत सिंह, राहुल त्रिपाठी, एडन मार्करम, हॅरी ब्रूक, वॉशिंग्टन सुंदर, अब्दुल समाद, भुवनेश्वर कुमार, टी. नटराजन, उमरान मलिक, अदिल रशीद ; लखनौ सुपर जायंट्स -केएल राहुल, काइल मेयर्स, दीपक हुड्डा, मार्कस स्टॉसनिस, निकोलस पूरन, रोमारिओ शेपहर्ड, क्रुनाल पंड्या, अमित मिश्रा, यश ठाकूर, जयदेव उनाडकट, रवी बिश्नोई.
हेही वाचा :IPL 2023 : इंग्लंडचा वेगवान गोलंदाज रीस टॉपले दुखापतीमुळे आयपीएलमधून बाहेर