चेन्नई : IPL च्या सहाव्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने लखनौ सुपर जायंट्सचा 12 धावांनी पराभव केला आहे. चेन्नईचा या सिजनमधला पहिला विजय ओहे. गेल्या सामन्यात चेन्नईला गुजरात टायटन्सविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला होता. एमए चिदंबरम स्टेडियमवर नाणेफेक गमावल्यानंतर चेन्नईने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 7 गडी गमावून 217 धावा केल्या. प्रत्युत्तरात लखनौचा संघ 20 षटकांत सात गडी गमावून 205 धावाच करू शकला.
धोनीने रचला इतिहास :चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार आणि अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज एमएस धोनीने सोमवारी आयपीएलमध्ये मोठा इतिहास रचला. धोनीने पाच हजार धावांचा टप्पा पार केला आहे. आयपीएलमध्ये यष्टिरक्षक म्हणून पाच हजार धावा करणारा तो पहिला खेळाडू आहे. लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध चेपॉक स्टेडियमवर ३ चेंडूत १२ धावांच्या खेळीत त्याने ही कामगिरी केली. धोनी फलंदाजीला आला तेव्हा हा पल्ला गाठण्यासाठी त्याला फक्त ८ धावांची गरज होती.
लाजीरवाणा विक्रम : आयपीएल 2023 मध्ये सहावा सामना चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध लखनऊ सुपरजायंट्स असा खेळला गेला. चेन्नई येथील चेपॉक स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात चेन्नईने 12 धावांनी विजय मिळवला. विजय मिळवला असला तरी, या सामन्यात चेन्नईचे वेगवान गोलंदाज चांगलेच महागडे ठरले. इम्पॅक्ट प्लेयर म्हणून मैदानात पाऊल ठेवलेल्या तुषार देशपांडे याने आपल्या पहिल्या षटकात एक नकोसा विक्रमही आपल्या नावे करून घेतला.