हैदराबाद : भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन याने आयपीएलमध्ये आपली पहिली विकेट घेतली आहे. त्याने सनरायझर्स हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात मुंबई इंडियन्सला विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. अर्जुनने रविवारी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या सामन्यात आयपीएल पदार्पण केले. त्याच्या पदार्पणासह सचिन आणि अर्जुन हे आयपीएलमध्ये खेळणारी पहिली पिता आणि पुत्राची जोडी ठरली आहे. तथापि, 23 वर्षीय अर्जुन आपल्या सामन्यात एकही विकेट घेऊ शकला नाही. केकेआर विरुद्ध त्याने दोन षटके टाकली ज्यात त्याने 17 धावा दिल्या होत्या.
हैदराबादविरुद्ध शेवटच्या षटकात धारदार गोलंदाजी : हैदराबादविरुद्ध त्याच्या स्पेलच्या पहिल्या दोन षटकांमध्येही तो विकेट रहित होता. पण जेव्हा मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने शेवटच्या षटकात त्याच्यावर 20 धावांचा बचाव करण्याची जबाबदारी दिली, तेव्हा अर्जुन त्या कसोटीला खरा उतरला. शेवटच्या षटकात त्याने धारदार यॉर्कर टाकत 5 चेंडूत केवळ 5 धावा दिल्या. तसेच त्याने या षटकात भुवनेश्वर कुमारची विकेटही घेतली. ही त्याची पहिली आयपीएल विकेट आहे. सचिन तेंडुलकरने मुंबई इंडियन्सच्या विजयाच्या हॅट्ट्रिकनंतर एक ट्विट केले आणि म्हटले की, मुंबई इंडियन्सने पुन्हा एकदा चमकदार कामगिरी केली आहे. कॅमेरून ग्रीनने बॉल आणि बॅट दोन्हीनेही उत्तम कामगिरी केली. ईशान आणि तिलक यांंनीही उत्कृष्ट फलंदाजी केली, आणि शेवटी तेंडुलकरला आयपीएलमधील पहिली विकेट मिळाली आहे.