जयपूर :आयपीएल 2023 मधील 48 व्या सामन्यात आज राजस्थान रॉयल्ससमोर गुजरात टायटन्सचे आव्हान होते. जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर हा सामना खेळवला गेला. या सामन्यात गुजरात टायटन्सने राजस्थान रॉयल्सवर 9 गडी राखून दणदणीत विजय मिळवला आहे. या विजयासह गुजरातचे 9 सामन्यात 6 विजयासह 12 गुण झाले असून गुजरातचा संघ गुणतालीकेत अव्वल स्थानी आहे. राजस्थानची चौथ्या स्थानी घसरण झाली असून त्यांचे 9 सामन्यात 10 गुण आहेत.
हार्दिक पंड्याची धुवांधार खेळी : राजस्थानने दिलेल्या 119 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना गुजरातच्या सलामीवीरांनी चांगली सुरुवात केली. ऋद्धिमान साहाने 34 चेंडूत नाबाद 41 धावा केल्या. तर शुभमन गिलने 35 चेंडूत 36 धावा केल्या. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या हार्दिक पंड्याने 15 चेंडूत धुवांधार 39 धावांचे योगदान दिले. राजस्थानकडून युझवेंद्र चहलने एकमेव विकेट घेतली.
संजू सॅमसनची एकाकी झुंझ :तत्पूर्वी, राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना राजस्थानने 17.5 षटकांत सर्वबाद 118 धावा केल्या. संजू सॅमसन वगळता राजस्थानचा एकही खेळाडू मोठी धावसंख्या उभारू शकला नाही. सॅमसनने 20 चेंडूत 30 धावा केल्या. गुजरातकडून राशिद खानने घातक गोलंदाजी केली. त्याने 4 षटकांत 14 धावा देत 3 विकेट घेतल्या.
गुजरात टायटन्स (प्लेइंग 11) : ऋद्धिमान साहा (विकेटकीपर), हार्दिक पंड्या (कर्णधार), विजय शंकर, डेव्हिड मिलर, अभिनव मनोहर, राहुल तेवातिया, राशिद खान, मोहित शर्मा, नूर अहमद, मोहम्मद शमी, जोशुआ लिटल ; इम्पॅक्ट प्लेअर - शुभमन गिल, साई सुदर्शन, श्रीकर भरत, शिवम मावी, रविश्रीनिवासन साई किशोर