नवी दिल्ली :काल रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सनरायजर्स हैदराबादवर आठ गडी राखून मोठा विजय मिळवल्यानंतर त्यांची प्ले - ऑफमध्ये जाण्याची शक्यता कायम आहे. आता आपला शेवटचा सामना जिंकताच रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ शेवटच्या 4 संघांमध्ये सामील होईल आणि प्ले - ऑफमध्ये जाईल. त्याचवेळी ऑरेंज कॅपच्या शर्यतीतही बंगळुरूचा कर्णधार फाफ डू प्लेसिसला पराभूत करणे कठीण आहे. मात्र पर्पल कॅपच्या शर्यतीत सध्या अनेक खेळाडू आहेत.
ऑरेंज कॅपच्या शर्यतीत डू प्लेसिस अव्वल स्थानी : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कर्णधार फाफ डू प्लेसिस आणि कोहलीच्या शानदार खेळीमुळे आरसीबीने केवळ सामना जिंकला नाही तर उत्तर रनरेटच्या जोरावर गुणतालिकेत चौथे स्थानही मिळवले. सनरायझर्स हैदराबादकडून हेनरिक क्लासेनने 104 धावांची धडाकेबाज खेळी खेळली. त्याला बंगळुरूकडून सलामीवीर विराट कोहलीने उत्तर दिले आणि 100 धावा करत संघाला 8 विकेटने विजय मिळवून दिला. या शतकी खेळीसह कोहली ऑरेंज कॅपच्या शर्यतीत चौथ्या स्थानावर आला आहे. तर फाफ डू प्लेसिस 71 धावांची खेळी खेळून या मोसमात 700 धावा करणारा पहिला खेळाडू ठरला आहे. त्याने 13 डावांमध्ये 702 धावा ठोकल्या आहेत. त्या पाठोपाठ गुजरातच्या शुभमन गिलने 576 तर राजस्थानच्या यशस्वी जयस्वालने 575 धावा केल्या आहेत. विराट कोहली 538 धावांलह चौथ्या स्थानावर आहे.