अहमदाबाद :आयपीएल 2023 मध्ये आज गुजरात टायटन्सचा सामना लखनऊ सुपर जायंट्सशी होता. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना खेळला गेला. या सामन्यात गुजरात टायटन्सने लखनऊ सुपर जायंट्सचा 56 धावांनी पराभव केला आहे.
मोहित शर्माच्या 4 विकेट :गुजरातने दिलेले 228 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना लखनऊचा संघ 20 षटकांत केवळ 171-7 धावांच करू शकला. लखनऊकडून डी कॉकने 41 चेंडूत सर्वाधिक 70 धावांचे योगदान दिले. त्याला मेयर्सने 48 धावा काढत उत्तम साथ दिली. मात्र इतर फलंदाज अपयशी ठरले. गुजरातकडून वेगवान गोलंदाज मोहित शर्माने 4 षटकांत 29 धावा देत 4 विकेट घेतल्या.
शुभमन गिलच्या 94 धावा : लखनऊचा कर्णधार क्रुनाल पंड्याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना गुजरातने 20 षटकांत 2 गड्यांच्या मोबदल्यात 227 धावा केल्या. गुजरातकडून सलामीवीर शुभमन गिल आणि ऋद्धिमान साहाने तडाखेबाज फलंदाजी केली. गिलने 51 चेंडूत 7 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने नाबाद 94 धावा केल्या. तर साहाने 43 चेंडूत 81 धावा केल्या. त्याने 10 चौकार आणि 4 षटकार ठोकले. लखनऊकडून मोहसिन खान आणि आवेश खानने प्रत्येक 1-1 बळी घेतला.
लखनऊ सुपर जायंट्स (प्लेइंग 11) : क्विंटन डी कॉक, काइल मेयर्स, दीपक हुडा, कृणाल पंड्या (कर्णधार), मार्कस स्टॉइनिस, निकोलस पूरन (विकेटकीपर), स्वप्नील सिंग, यश ठाकूर, रवी बिश्नोई, मोहसीन खान, आवेश खान ; इम्पॅक्ट प्लेअर्स -आयुष बदोनी, अमित मिश्रा, डॅनियल सॅम्स, युधवीर सिंग, प्रेरक मंकड.