अहमदाबाद : इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2023 ची फायनल रविवारी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळली जाणार आहे. फायनलमध्ये गतविजेत्या गुजरात टायटन्सचा सामना 4 वेळच्या विजेत्या चेन्नई सुपर किंग्जशी आहे. या मोसमात दोन्ही संघ सर्वात सातत्यपूर्ण आहेत. लीग टप्प्यात गुणतालिकेत त्यांनी अनुक्रमे पहिले आणि दुसरे स्थान मिळवले होते. हे दोन्ही संघ क्वालिफायर 1 मध्ये आमनेसामने आले होते. त्या सामन्यात महेंद्रसिंह धोनीच्या चेन्नईने हार्दिक पांड्याच्या गुजरातवर मात केली होती. आता ते विजेतेपदाच्या सामन्यात पुन्हा आमनेसामने आहेत.
गुजरातच्या खेळाडूंकडे ऑरेंज आणि पर्पल कॅप : शुभमन गिलने या मोसमात धमाकेदार फलंदाजी केली आहे. त्याने 15 सामन्यांमध्ये 851 धावा केल्या आहेत. यात 3 शतके आणि 4 अर्धशतकांचा समावेश आहे. आयपीएलच्या एका मोसमात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम विराट कोहलीच्या नावे आहे. त्याने 2016 मध्ये 4 शतकांच्या मदतीने 973 धावा केल्या होत्या. गोलंदाजीत गुजरातच्या मोहम्मद शमी, राशिद खान आणि मोहित शर्मा या त्रिकुटाने अनुक्रमे 28, 27 आणि 24 विकेट्स घेत अव्वल तीन स्थानांवर कब्जा केला आहे.
दोन्ही कर्णधारांना विक्रमाची संधी : सीएसकेसाठी, वेळप्रसंगी विविध खेळाडूंनी चांगले प्रदर्शन करून सामने जिंकून दिले आहेत. अंतिम फेरीत गुजरातचा पराभव करताच धोनी कर्णधार म्हणून सर्वाधिक आयपीएल खिताब जिंकण्याच्या रोहित शर्माच्या विक्रमाची बरोबरी करेल. रोहितने कर्णधार म्हणून आत्तापर्यंत 5 आयपीएल खिताब जिंकले आहेत. दुसरीकडे, जर गुजरातने चेन्नईचा पराभव केला तर हार्दिक पांड्या एकूण आयपीएल खिताब जिंकण्याच्या रोहित शर्माच्या विक्रमाची बरोबरी करेल. रोहितकडे सध्या एकूण 6 आयपीएल खिताब आहेत.