पुणे:आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील पाचवा सामना पुण्यातील एमसीए ( Maharashtra Cricket Association ) मैदानावर खेळला जाणार आहे. या हंगामातील पुण्याच्या मैदानावर खेळला जाणार हा पहिला सामना आहे. हा सामना सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध राजस्थान रॉयल्स ( Sunrisers Hyderabad vs Rajasthan Royals ) संघात खेळला जाणार आहे. या सामन्याला सुरुवात संध्याकाळी साडेसात वाजत होणार आहे. राजस्थान आणि हैदराबादचे संघ अनुक्रमे संजू सॅमसन आणि केन विल्यमसनच्या नेतृत्वाखाली उतरतील.
रॉयल्सने 2008 मध्ये शेन वॉर्नच्या नेतृत्वाखाली त्यांचे पहिले आयपीएल विजेतेपद जिंकले. मात्र त्यानंतर संघाला कधीच प्रभावी कामगिरी करता आली नाही. सॅमसनने ( Captain Sanju Samson ) दरवर्षी एक-दोन सामन्यांत चांगला खेळ केला आहे, पण रॉयल्सला दुसरे विजेतेपद मिळवायचे असेल, तर त्याला त्याच्या कामगिरीत सातत्य ठेवावे लागेल. यामुळे सॅमसनला या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या टी-20 विश्वचषकासाठी भारतीय संघात आपले स्थान निश्चित करण्याची संधी मिळेल. जोस बटलर आणि देवदत्त पडिक्कल रॉयल्सच्या डावाची सुरुवात करू शकतात. बटलर कोणत्याही आक्रमणाला झुगारून देण्यास सक्षम आहे. पडिक्कलसह तो रॉयल्सला दमदार सुरुवात करून देऊ शकतो, ज्यामुळे सॅमसनसारख्या खेळाडूसाठी ते सोपे होईल.
मधल्या फळीत, रॉयल्सकडे पॉवर हिटर शिमरॉन हेटमायर ( Power heater Shimron Heitmeyer ), रसी व्हॅन डेर डुसेन, जिमी नीशम आणि रियान पराग सारखे खेळाडू आहेत. त्यांचे योगदान संघासाठी खूप महत्त्वाचे असेल. फिरकीपटू रविचंद्रन अश्विन आणि युझवेंद्र चहल यांच्या उपस्थितीत रॉयल्सकडे मजबूत गोलंदाजी युनिट आहे. हे दोघेही प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळतील याची खात्री असून त्यांची आठ षटके खूप महत्त्वाची असतील. वेगवान गोलंदाजी विभागाचे नेतृत्व ट्रेंट बोल्टकडे असेल, त्याच्यासोबत प्रसिद्ध कृष्णा आणि नवदीप सैनी आहेत.
सनरायझर्सबद्दल बोलायचे तर कर्णधार केन विल्यमसन ( Captain Ken Williamson ) सर्वात अनुभवी फलंदाज आहे. त्याचा न्यूझीलंडचा सहकारी ग्लेन फिलिप्स डावाची सुरुवात करू शकतो. मधल्या फळीची जबाबदारी निकोलस पूरन, प्रियम गर्ग आणि राहुल त्रिपाठी यांच्यावर असेल. विल्यमसन तिसऱ्या क्रमांकावर उतरला तर रविकुमार समर्थ सलामीवीराची भूमिका बजावू शकतो. तर अब्दुल समदची भूमिका फिनिशरची असेल.