पुणे:आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील चौदावा सामना आज पुण्यातील एमसीए क्रिकेट मैदानावर खेळला जात आहे. हा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स संघात ( Mumbai Indians vs Kolkata Knight Riders ) सुरु आहे. कोलकाता नाईट रायडर्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्याचबरोबर प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या मुंबई इंडियन्स संघाने 4 बाद 161 धावा केल्या आहेत. त्याचबरोबर कोलकाता संघाला 162 धावांचे लक्ष्य दिले आहे.
मुंबई इंडियन्सकडून सूर्यकुमार यादव (52) आणि तिलक वर्मा (नाबाद 38) यांनी शानदार फलंदाजी केली. एमआयसाठी सूर्यकुमार आणि वर्मा यांनी 49 चेंडूत 83 धावांची भागीदारी केली. कोलकाताकडून पॅट कमिन्सने दोन बळी घेतले. त्याचवेळी उमेश यादव आणि वरुण चक्रवर्तीने प्रत्येकी एक विकेट घेतली.
तिसर्या क्रमांकावर आलेल्या देवाल्ड ब्रेविसने ( Dewald Brewis ) इशान किशनसोबत काही झटपट शॉट्स खेळले. पण वरुण चक्रवर्तीच्या गोलंदाजीवर दोन चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने 19 चेंडूत 29 धावा करून ब्रेव्हिस बाद झाला, त्यामुळे मुंबईने 8 षटकांत 2 गडी गमावून 42 धावा केल्या. चौथ्या क्रमांकावर आलेल्या सूर्यकुमार यादवने इशानसह संघासाठी काही महत्त्वाच्या धावा जोडल्या, पण 11व्या षटकात कमिन्सच्या चेंडूवर धावा काढण्याच्या प्रक्रियेत इशान (14) श्रेयस अय्यरकडे झेल देत बाद झाला.