मुंबई - १८ फेब्रुवारीला होणाऱ्या इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) यंदाच्या लिलावासाठी खेळाडूंची अंतिम यादी गुरुवारी जाहीर करण्यात आली आहे. चेन्नई येथे होणार्या आयपीएल लिलावात एकूण २९२ खेळाडूंवर बोली लागणार आहे. यामध्ये १६४ भारतीय, १२५ परदेशी आणि सहयोगी देशांतील ३ खेळाडूंचा समावेश असेल.
यावेळी आयपीएलच्या ८ संघांनी १३९ खेळाडू कायम राखले आहेत, तर ५७ खेळाडूंना त्यांच्या संघातून मुक्त करण्यात आले आहे. एकूण १९६.६ कोटींची ही लिलावप्रक्रिया पार पडणार आहे. गेल्या आठवड्यात १११४ क्रिकेटपटूंनी लिलावासाठी नोंदणी केली होती. आठही फ्रेंचायझींनी निवड केलेल्या खेळाडूंची यादी सादर केल्यानंतर अंतिम यादी जाहीर केली गेली.
श्रीशांतच्या पदरी मात्र निराशा
यंदा आयपीएलमध्ये पुनरागमन करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या श्रीशांतच्या पदरी मात्र निराशा आली आहे. आयपीएलच्या शॉर्टलिस्ट खेळाडूंमध्ये त्यांच्या नावाचा समावेश झालेला नाही.