दुबई - चेन्नई सुपर किंग्सचा युवा सलामीवीर फलंदाज ऋतुराज गायकवाड याने मुंबई इंडियन्स विरुद्धच्या आपल्या दमदार खेळीबद्दल मोठी प्रतिक्रिया दिली आहे. त्याने ही खेळी आपल्या आतापर्यंतच्या सर्वोत्कृष्ठ खेळीपैकी एक असल्याचे म्हटलं आहे.
मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने पावर प्लेमध्ये आपले चार विकेट फेकली आणि संघ अडचणीत सापडला. तेव्हा सलामीवीर फलंदाज ऋतुराज गायकवाड याने एक बाजू लावून धरली होती. त्याने अखेरपर्यंत नाबाद राहात दमदार खेळी केली. त्याच्या खेळीच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्सला सन्मानजनक आव्हान उभारता आले.
ऋतुराज गायकवाड याने 41 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याने 58 चेंडूत 9 चौकार आणि 4 षटकाराच्या मदतीने नाबाद 88 धावांची खेळी केली. त्याला ड्वेन ब्राव्होने 8 चेंडूत 23 धावांची खेळी करत चांगली साथ दिली.
ऋतुराज गायकवाड याने मुंबई इंडियन्सविरुद्धच्या खेळीला सर्वोत्कृष्ठ खेळीपैकी एक असल्याचे सांगितले. तो सामना संपल्यानंतर म्हणाला की, निश्चितपणे ही माझी आतापर्यंतच्या सर्वोत्कृष्ट खेळीपैकी एक आहे. अनुभवी खेळाडू पव्हेलियनमध्ये परतले होते आम्ही अनेक विकेट गमावल्या. अशात माझ्यावर संघाला 130, 140 किंवा 150 धावांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी होती. जेव्हा महेंद्रसिंग धोनी सोबत असेल आणि सीएसके मॅनेजमेंट तुमच्या पाठिंशी असेल तर काही अडचण येत नाही. श्रीलंका दौऱ्याचा देखील ही खेळी साकारताना मला खूप फायदा झाला.
दरम्यान, ऋतुराज गायकवाडच्या खेळीच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्जने मुंबई इंडियन्ससमोर विजयासाठी 157 धावांचे आव्हान ठेवले होते. प्रत्युत्तरादाखल मुंबईच्या संघाला 20 षटकात 8 बाद 136 धावांपर्यंत मजल मारता आली. परिणामी चेन्नईने हा सामना 20 धावांनी जिंकला. याविजयासह चेन्नईचा संघ गुणतालिकेत अव्वलस्थानी पोहोचला.
हेही वाचा -IPL 2021 : 'आयपीएल 2020 मधील आठवणींसह पुढे पावले टाकू'
हेही वाचा -IPL 2021 : चेन्नई सुपर किंग्सचा मुंबई इंडियन्सवर 20 धावांनी विजय