मुंबई- मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या आयपीएलच्या आठव्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने पंजाब किंग्जवर 6 गडी राखून सहज मात केली. या सामन्यात चेन्नईने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, पंजाबची सुरूवात खराब झाली. चेन्नईचा वेगवान गोलंदाज दीपक चहरची भेदक गोलंदाजीने पंजाबची फलंदाजी पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली. चेन्नईच्या क्षेत्ररक्षकांनी केलेल्या अफलातून क्षेत्ररक्षणामुळे पंजाबला 20 षटकात केवळ 8 बाद 106 धावांपर्यंतच मजल मारता आली. प्रत्युत्तरात चेन्नईने हे आव्हान 15.4 षटकांतच गाठले आणि यंदाच्या पर्वातील पहिल्या विजयाची नोंद केली. महेंद्रसिंह धोनीचा हा चेन्नईसाठी 200वा सामना होता. त्यामुळे हा विजय त्याच्यासाठी अजूनच खास ठरला.
मोईन अलीने 7 चौकार आणि एका षटकारासह 46 धावा करत मोलाची कामगिरी बजावली. पंजाबकडून शाहरुख खान ४७ धावा केल्या.
पंजाबच्या माफक आव्हानाचा पाठवाग करताना चेन्नईची सुरुवात खराब झाली. पंजाबचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने ऋतुराज गाकवाडला (5) बाद करत पहिला धक्का दिला. त्यानंतर फाफ डु प्लेसिस आणि मोईन अली यांनी 6 षटकात चेन्नईच्या 1 बाद 32 धावा फलकावर लावल्या. मोईन अलीेने संयमी खेळ करत डु प्लेसिसला उत्तम साथ दिली. या दोघांनी 37 चेंडूत आपली अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली.