मुंबई -दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज डेल स्टेनने आयपीएलबाबत वादग्रस्त वक्तव्य केले आहे. यंदाच्या आयपीएलमधून बाहेर पडलेला स्टेन सध्या पाकिस्तान सुपर लीग (पीएसएल) स्पर्धा खेळत आहे. ''पीएसएल आयपीएलपेक्षा अधिक फायद्याची आहे'', असे स्टेन म्हणाला. स्टेनच्या या विधानावरून त्याला भारतीय चाहत्यांकडून ट्रोल केले जात आहे.
स्पर्धेतून ब्रेक का घ्यावा आणि खेळाडूंच्या किंमतींचा टॅग कशा प्रकारे सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करतो, हे ३७ वर्षीय स्टेनने स्पष्ट केले. तो म्हणाला, "मला थोडा वेळ हवा होता. मला असे आढळले की, या इतर लीगमध्ये खेळणे हे खेळाडू म्हणून थोडे अधिक फायद्याचे होते. मला वाटते की जेव्हा तुम्ही आयपीएलमध्ये जाता तेव्हा बरीच बडबड होते. तेथे बरेच मोठे खेळाडू आणि संघ असतात. बहुधा खेळाडूंच्या कमाईवर जास्त लक्ष असते. कधीकधी या सर्वांमुळे क्रिकेटला विसरले जाते."
स्टेनने पाकिस्तानच्या पीएसएल आणि श्रीलंकेच्या लंका प्रीमियर लीगला एक आकर्षक स्पर्धा म्हटले आहे. तो म्हणाला, ''जेव्हा तुम्हाला पीएसएल किंवा एलपीएलमध्ये खेळता, तेव्हा तिथे क्रिकेटवा महत्त्व दिले जाते. मला इथे येऊन काही दिवस झाले आहेत आणि लोक मला माझ्या खेळाविषयी विचारत आहेत. आयपीएलमध्ये या गोष्टी विसराव्या लागतात. तिथे कोण किती कमावते, याकडे लक्ष असते. हे एक कटू सत्य आहे. मी अशा गोष्टींपासून दूर राहू इच्छितो. कारण, मला खेळाकडू अधिक लक्ष द्यायचे आहे.''
इतर लीग खेळायच्या असल्यामुळे स्टेनने यंदाच्या आयपीएलमध्ये न खेळण्याचा निर्णय घेतला. स्टेनने ९५ आयपीएल सामन्यांत ९७ बळी घेतले आहेत. ८ धावांत ३ बळी ही स्टेनची सर्वोत्तम आयपीएल कामगिरी आहे. दुखापतीमुळे गेल्या तीन आयपीएल मोसमात तो फक्त १२ सामने खेळू शकला आहे.
हेही वाचा - सेहवागला शतकापासून रोखणारा आज चालवतोय बस!