चेन्नई : सनरायझर्स हैदराबादवर सात गडी राखून विजय मिळवल्यानंतर चेन्नई सुपर किंग्जचे मुख्य प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांनी संघाचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सच्या फिटनेसच्या बाबतीत अपडेत दिले आहे. फ्लेमिंगने सांगितले की, स्टोक्स दुखापतीमुळे आणखी एका आठवड्यासाठी टीमच्या बाहेर असणार आहे.
स्टोक्सच्या पायाच्या बोटाला दुखापत : इंग्लंडचा कसोटी कर्णधार बेन स्टोक्सने आयपीएल 2023 मध्ये चेन्नईकडून आतापर्यंत सहा सामन्यांपैकी केवळ दोन सामने खेळले आहेत. त्याच्या पायाच्या बोटाला दुखापत झाली असून डाव्या गुडघ्यातही दुखापत आहे. फ्लेमिंगने सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत सांगितले की, आमचे प्राधान्य बेन स्टोक्सला तंदुरुस्त आणि खेळण्यासाठी तयार करणे आहे. त्यावरच आम्ही लक्ष केंद्रित करत आहोत. मात्र या क्षणी तो तयार नाही.
चेन्नईने स्टोक्सला 16.25 कोटींना करारबद्ध केले आहे :यापूर्वी बेन स्टोक्स 12 एप्रिल रोजी राजस्थान रॉयल्सविरुद्ध आणि 21 एप्रिल रोजी सनरायझर्स हैदराबाद विरुद्धच्या सामन्यातूनही बाहेर होता. चेन्नईने स्टोक्सला या हंगामात 16.25 कोटी रुपयांना करारबद्ध केले आहे. आयपीएल सुरू होण्यापूर्वीच बेन स्टोक्स आयपीएलमध्ये अष्टपैलू खेळाडूची भूमिका साकारू शकणार नाही, अशी बातमी आली होती. या हंगामात तो दुखापतीमुळे गोलंदाजी करताना दिसणार नाही.
फ्लेमिंगने केले कॉनवेचे कौतुक : फ्लेमिंगने 21 एप्रिल रोजी सनरायझर्स हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात 57 चेंडूत 12 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने नाबाद 77 धावा केल्याबद्दल डावखुरा सलामीवीर डेव्हन कॉनवेचे कौतुक केले आहे. 135 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना कॉनवेचे आयपीएल 2023 मधील हे सलग तिसरे अर्धशतक होते. तसेच त्याने ऋतुराज गायकवाड सोबत 87 धावांची सलामीची भागीदारी देखील केली. चार वेळची आयपीएल चॅम्पियन चेन्नई आता रविवारी संध्याकाळी कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर होणाऱ्या त्यांच्या पुढील सामन्यात दोन वेळा विजेत्या कोलकाता नाइट रायडर्सशी भिडणार आहे.
हे ही वाचा :MS Dhoni With SRH Team : माहीने दिल्या हैदराबादच्या युवा खेळाडूंना टिप्स, पहा व्हिडिओ