हैदराबाद:आशिया कप 2022 चे वेळापत्रक जाहीर ( Asia Cup Schedule Announce ) झाले आहे. आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष जय शाह यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर या स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर केले. शनिवार 27 ऑगस्टपासून या स्पर्धेला सुरुवात होणार असून, यात श्रीलंकेचा सामना अफगाणिस्तानशी दुबईत होणार आहे.
भारत या स्पर्धेचा गतविजेता आहे, जो आपले विजेतेपद राखण्यासाठी मैदानात उतरेल. यावेळी ही स्पर्धा टी-20 फॉरमॅटमध्ये खेळवली जाणार आहे, ज्याकडे आशियाई संघ देखील टी-20 विश्वचषकापूर्वीची तयारी म्हणून पाहत आहेत. या स्पर्धेच्या हाय व्होल्टेज सामन्याबद्दल बोलायचे, तर तो सामना रविवार 28 ऑगस्ट रोजी दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर दोन कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान आमनेसामने ( IND vs PAK ) असतील. गेल्या वर्षी दुबईत झालेल्या टी-20 विश्वचषकात दोन्ही संघ शेवटचे आमनेसामने आले होते, जिथे भारताला पाकिस्तानविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला होता.
या स्पर्धेत भारतही त्या पराभवाचा बदला घेण्यासाठी उत्सुक असेल. या स्पर्धेत एकूण 6 संघ सहभागी होणार आहेत. सध्या 5 संघांचे चित्र स्पष्ट झाले आहे, तर सहावा संघ पात्र होऊन येथे पोहोचेल. ही 13 दिवस चालणारी स्पर्धा 27 ऑगस्टपासून सुरू होईल, रविवारी 11 सप्टेंबर रोजी अंतिम सामना होईल. यावेळी आशिया चषक टी-20 स्वरूपात ( Asia Cup in T20 format ) खेळवला जाईल, तर यापूर्वी 2018 मध्ये ही स्पर्धा एकदिवसीय स्वरूपात खेळली गेली होती, ज्याचे विजेतेपद भारताने जिंकले होते.