नवी दिल्ली IPL Auction 2024 : अनेक क्रिकेटपटूंसाठी २०२३ चा शेवट आनंदाची बातमी घेऊन आला. या वर्षाच्या अखेरीस झालेल्या आयपीएल लिलावात सर्व फ्रँचायझींनी पाण्यासारखा पैसा खर्च केला आहे. लिलावात भारतासह परदेशातील अनेक खेळाडू मालामाल झाले. चला तर मग आज जाणून घेऊया या लिलावाद्वारे कोणते खेळाडू रातोरात कोट्यधीश झाले.
- मिचेल स्टार्क : आयपीएल २०२४ च्या लिलावात ऑस्ट्रेलियाचा अनुभवी वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कवर सर्वाधिक बोली लागली. कोलकाता नाईट रायडर्सनं त्याला २४.७५ कोटी रुपयात खरेदी केलं. यासह स्टार्क इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू बनला आहे. स्टार्कसाठी केकेआर शिवाय गुजरात टायटन्सनंही बोली लावली होती.
- पॅट कमिन्स :या लिलावात ऑस्ट्रेलियाचा विश्वविजेता कर्णधार पॅट कमिन्सवरही पैशांचा पाऊस पडला. सनराजर्स हैदराबादनं त्याचा २०.५ कोटी रुपयांमध्ये संघात समावेश केला. यासह कमिन्स आयपीएलच्या इतिहासातील दुसरा सर्वात महागडा खेळाडू बनला आहे. हैदराबादशिवाय गुजरात टायटन्सनंही कमिन्ससाठी मोठी बोली लावली होती.
- डॅरिल मिशेल :न्यूझीलंडचा स्फोटक फलंदाज डॅरिल मिशेलला चेन्नई सुपर किंग्जनं १४ कोटी रुपयांना खरेदी केलं. सुरुवातीला पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्सनं त्याच्यावर जोरदार बोली लावली होती. मात्र शेवटी सीएसकेनं बाजी मारली. आयपीएल २०२४ च्या हंगामातील तो तिसरा सर्वात महागडा खेळाडू आहे.
- हर्षल पटेल : टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज हर्षल पटेलला पंजाब किंग्जनं ११.७५ कोटी रुपयांना करारबद्ध केलं. त्याच्यासाठी गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात जोरदार बोलीयुद्ध रंगलं होतं. या आयपीएल लिलावातील तो चौथा सर्वात महागडा खेळाडू आहे.
- अल्झारी जोसेफ :वेस्ट इंडिजचा वेगवान गोलंदाज अल्झारी जोसेफला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं ११.५० कोटी रुपयांना विकत घेतलं. तो या आयपीएल लिलावातील पाचवा सर्वात महागडा खेळाडू आहे.
- समीर रिझवी :उत्तर प्रदेशच्या मेरठचायुवा अनकॅप्ड खेळाडू समीर रिझवीला या लिलावात भरपूर पैसे मिळाले. त्याची मूळ किंमत २० लाख रुपये होती. त्याला चेन्नई सुपर किंग्सनं ८.५० कोटी रुपयांना खरेदी केलं. २० वर्षांचा समीर रिझवी त्याच्या चौफेर फटकेबाजीसाठी ओळखला जातो.
- शुभम दुबे : विदर्भाकडून खेळणाऱ्या शुभम दुबेची मूळ किंमत २० लाख रुपये होती. या लिलावात राजस्थाननं त्याला ५.८० कोटी रुपयांना खरेदी केलं. दिल्ली आणि राजस्थान या दोन्हींनी त्याच्यासाठी बोली लावली होती.
- रोव्हमन पॉवेल :वेस्ट इंडिजचा अष्टपैलू खेळाडू रोव्हमन पॉवेलला राजस्थान रॉयल्सनं ७.४ कोटी रुपयांना विकत घेतलं. त्याच्यासाठी कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात लढत पाहायला मिळाली. शेवटी आरआरनं बाजी मारली.
- ट्रॅव्हिस हेड :ऑस्ट्रेलियन सलामीवीर ट्रॅव्हिस हेडला सनरायझर्स हैदराबादनं ६.८० कोटी रुपयांमध्ये आपल्या संघात समाविष्ट केलं. हेडची मूळ किंमत २ कोटी रुपये होती. त्याच्यासाठी चेन्नई सुपर किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबाद यांनी बराच वेळ बोली लावली होती, अखेर हैदराबादनं बाजी मारली.
- शार्दुल ठाकूर :टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूरला चेन्नई सुपर किंग्जनं ४ कोटी रुपयांना विकत घेतलं. त्याची मूळ किंमत २ कोटी रुपये होती. सीएसके आणि सनरायझर्स हैदराबादनं शार्दुलसाठी बोली लावली होती.